नवी दिल्ली
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या वैद्यकीय अहवालानंतर प्रियंका गांधी यांनी स्वतःला ‘क्वारंटाईन’ केले असून निवडणूक होणाऱया राज्यांमधील सर्व नियोजित दौरे त्यांनी रद्द केले आहेत. प्रियंका गांधी यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून स्वतःला वेगळे ठेवले आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत आपली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट केले. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण स्वतःला आयसोलेट केल्याचे त्या म्हणाल्या. सावधगिरीचा उपाय म्हणून आपण स्वतः आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारात सहभागी होणार नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह मतदारांची माफी मागितली आहे.









