चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सलग पराभवाच्या खाईत लोटला गेल्यानंतर डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला पाचारण करावे, अशी मागणी चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. त्यावर चेन्नई प्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी रैनाचा आपण विचार करत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले होते. त्यानंतर रविवारी दिवसभर रैनाने चेन्नई सुपरकिंग्स व महेंद्रसिंग धोनी यांना ट्वीटरवर अनफॉलो केल्याची चर्चा रंगत राहिली. काशी विश्वनाथन यांच्याकडून प्रतिकूल निरोप आल्याने रैना व्यवस्थापनावर नाराज असल्याचेही बोलले जाऊ लागले. पण, प्रत्यक्षात मात्र अशी काहीच परिस्थिती नव्हती. रैनाने ट्वीटरवर संघाला अनफॉलो केले असल्याचे दिसून आले नाही. फॉलोअर्सच्या यादीत तो होता. यामुळे, त्या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
चेन्नई सुपरकिंग्सचा आघाडीचा फलंदाज व उपकर्णधार सुरेश रैना मागील आठवडय़ात आयपीएल स्पर्धेला प्रत्यक्ष प्रारंभ होण्यापूर्वीच मायदेशी परतला. वैयक्तिक कारणास्तव आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा त्याने त्यावेळी केली होती. त्यानंतर चेन्नईने लागोपाठ पराभव स्वीकारल्यानंतर रैनाला पुन्हा पाचारण केले जाण्याची मागणी होऊ लागली. पण, चेन्नई प्रँचायझीचे सीईओ विश्वनाथन यांनी ते शक्य नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले.
‘रैनाने मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला, त्याचा आम्ही आदर करतो. तूर्तास, रैनाला परत बोलावण्याचा काही प्रश्न येत नाही. आमचा संघ लवकरच विजयाच्या ट्रकवर परतताना दिसेल’, असे विश्वनाथन यापूर्वी म्हणाले होते.









