वृत्तसंस्था/ साखिर, बहरिन
येथे झालेल्या साखिर ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत रेसिंग पॉईंटच्या सर्जिओ पेरेझने जेतेपद पटकावले. त्याचे हे पहिलेच एफ वन जेतेपद आहे. शेवटच्या स्थानावरून सुरू केल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांच्या अडचणींचा लाभ घेत पेरेझने पहिले यश मिळविले.
30 वर्षीय पेरेझ हा एफ वनचे जेतेपद पटकावणारा 1970 नंतर मेक्सिकोचा पहिला ड्रायव्हर आहे. त्यावर्षी पेड्रो रॉड्रिगेझने एफ वन शर्यत जिंकली होती. या मोसमात प्रत्येक शर्यतीत मर्सिडीजनेच सर्वाधिक वर्चस्व गाजविले. पण येथील शर्यतीत त्यांच्या व्हाल्टेरी बोटास व हॅमिल्टनच्या जागी आलेला जॉर्ज रसेल यांना अनुक्रमे आठवे व नववे स्थान मिळाले. पेरेझची ही शेवटची शर्यत असून पुढील वर्षी रेसिंग पॉईंटने त्याच्या जागी सेबॅस्टियन व्हेटेलला स्थान दिले आहे. रेनॉच्या एस्टेबन ओकॉनने दुसरे, रेसिंग पॉईंटच्या लान्स स्ट्रोलने तिसरे, मॅक्लारेनच्या कार्लोस सेन्झने चौथे, रेनॉच्या डॅनियल रिकार्दोने पाचवे, अल्बॉनने सहावे, अल्फा टॉरीच्या डॅनील क्वायटने सातवे, मॅक्लारनेच्या लँडो नॉरिसने दहावे स्थान मिळविले.









