कणकवलीत सोशल डिस्टन्सिंग पाळत धान्यासाठी रांगा : पोलीसही तैनात
वार्ताहर / कणकवली:
केंद्र सरकारने प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक व अंत्योदय कार्डधारकांना प्रतीमाणसी 5 कि. मोफत धान्य देण्याची योजना जाहीर केल्यानंतर या योजनेंतर्गत कणकवली तालुक्यात रेशनदुकानांवर धान्य देण्याची कार्यवाही सोमवारपासून सुरू करण्यात आली. तालुक्यातील एकूण 69 धान्य दुकानांमध्ये हे धान्य येत्या पाच दिवसात देण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली. लाभार्थ्यांनी या धान्यासाठी रेशन दुकानांवर गर्दी न करता, रेशन दुकानदारांनी ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाळत धान्य स्वीकारण्याचे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले.
कणकवली शहरातील रेशनधान्य दुकानावर मंगळवारी रात्री धान्य प्राप्त झाले. त्यामुळे बुधवारी येथील कंझ्युमर्स सोसायटीच्या धान्य दुकानासमोर लाभार्थी शिधापत्रिकाधारकांनी अंतर ठेवत धान्यासाठी रांग लावली होती. या ठिकाणी शिधापत्रिकाधारकांनी गर्दी करू नये म्हणून पोलीसही कार्यरत ठेवण्यात आले होते.
दर महिन्याचे नियमित धान्य उचल केल्यानंतर तालुक्यातील रेशन दुकानदारांना मोफत धान्य योजनेंतर्गतचे धान्य वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील जांभळगावपासून मोफत धान्य योजनेचे धान्य पुरवठा करण्यात आले. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी तालुक्यात 470 टन तांदूळ मंजूर आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 76 टन तांदूळ मंजूर आहे. एकूण 546 टन तांदूळ मंजूर आहे. मोफत धान्य योजनेंतर्गत तालुक्यातील रेशनधान्य दुकानदारांना आठवडाभरात धान्य वितरण पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गावांमधील वाडीनिहाय शिधापत्रिकाधारकांना धान्य स्वीकारण्यासाठी नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, तेथील स्थितीनुसार दुकानदार याबाबत नियोजन करणार आहेत.
18 एप्रिलपर्यंत हे धान्य कार्डधारकांना वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामस्तरीय समितीसोबत धान्य वितरणाबाबत चर्चा करून धान्य वितरण गाव पातळीवर करता येईल का? याची माहिती घेत तसे शक्य झाल्यास त्यानुसार वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही गावांमध्ये सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, स्वयंसेवी संस्था, मंडळे आदींच्या माध्यमातून घरपोच धान्य सेवा देण्यात येत आहे. तालुक्यात पुरवठा विभागाच्या गोदामात तालुक्याचे सर्व धान्य ठेवण्यासाठी जागा अपुरी पडल्यास उर्वरित धान्य फोंडाघाट येथील गोदामात ठेवण्यात येणार आहे. तेथून त्या नजीकच्या रेशन दुकानांना वितरण करण्यात येणार आहे.









