प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोना काळात रेशन दुकानदारांनी सर्वसामान्य जनतेला रेशनचे वितरण केले आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत रेशनचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे काही रेशन दुकानदारांना कोरोनाची लागण झाली आहे. आशा कार्यकर्त्यांप्रमाणेच आम्हीही काम केले आहे. त्यामुळे आम्हालाही कोरोना वॉरियर्स म्हणून सरकारने सुविधा द्याव्यात, अशी मागणी जिल्हय़ातील रेशन दुकानदारांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या चार महिन्यांच्या कोरोना काळात आम्ही रेशन वितरणाचे काम करत असताना कमिशनदेखील वेळेत दिले नाही. महाराष्ट्र आणि गोवा सरकारप्रमाणे आम्हालाही कमिशन द्यावे. सध्या आम्हाला केवळ प्रत्येक क्विंटलला 100 रुपये कमिशन दिले जाते आहे. त्यामध्ये जागेचे भाडे तसेच नोकरांचा पगार काढणे अवघड आहे. आम्ही दुकान चालविल्यानंतर आमच्याबरोबर साहाय्यकांनीही काम केले आहे. त्यांनाही योग्य मोबदला द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
कोरोना झाल्यानंतर किंवा इतर कारणाने रेशन दुकानदारांचा मृत्यू झाला तर सरकार कोणतीच मदत करत नाही. तेव्हा 50 लाख रुपयांचा विमा आमच्या नावानेही काढावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. सरकारने रेशन दुकानदारांना योग्य ते कमिशन तसेच इतर सुविधा द्याव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेश तळवार, जिल्हा अध्यक्ष भैरगौडा पाटील, शहर अध्यक्ष मारुती पाटील, तालुका अध्यक्ष मारुती आंबोळकर, सरोजा दोडमनी, दिनेश बागडे, नारायण कालकुंद्री यांच्यासह दुकानदार उपस्थित होते.









