कमिशन मिळाले नसल्याने दुकाने बंद ठेऊन आंदोलनाचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
रेशन दुकानदारांना गेल्या चार महिन्यांपासून कमिशन दिले नाही. कोरोनाकाळात दिवसरात्र आम्ही काम केले आहे. आमच्या संपर्कात मोठय़ा प्रमाणात जनता येते. मात्र आम्हाला कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी कोणत्याच प्रकारे मदत करण्यात आली नाही. तरी देखील आम्ही काम करत असताना कमिशन नसल्याने 1 ऑगस्टपासून बेमुदत दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे रेशन दुकानदार असोसिएशनने सांगितले आहे.
रेशन दुकानदारांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. आम्ही मेहनत करत आहे. असे असताना आम्हाला देण्यात येणारे कमिशनदेखील गेल्या चार महिन्यांपासून दिले नाही. त्यामुळे आम्ही जीवन जगायचे कसे, असा प्रश्न त्यांनी केला आहे. क्विंटलला केवळ 100 रुपये कमिशन दिले जात आहे. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये क्विंटलला 220 रुपये कमिशन आहे. इतकी तफावत असूनही आम्ही काम करत आहे. सध्या सुरू असलेले 100 रुपये कमिशनदेखील देण्यास टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे आता आम्ही 1 ऑगस्टपासून माल उचलणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
जनतेला त्रास द्यायचा आमचा उद्देश नाही. मात्र आम्हालाही पोट आहे. त्यामुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. कोरोनाकाळात काम केल्यामुळे राज्यातील 12 रेशन दुकानदारांना कोरोनाची बाधा झाली आहे. तेव्हा रेशन दुकानदार व साहाय्यकांनाही 50 लाखाचा विमा लागू करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. जोपर्यंत आम्हाला कमिशन मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारादेखील देण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजशेखर तळवार होते. यावेळी नारायण कालकुंद्री, मारुती आंबोळकर, सुरेश राजूकर, दिनेश बागडे, प्रभू पाटील, पिंटू पाटील, रविंद्र गिंडे, बसवराज दोडमनी, राजू शटवाई, बाबू शिरहट्टी, कृष्णा कांबळे, सरोज दोडमनी, समीउल्ला अत्तार, नागराज पाटील, डी. जी. पाटील यांच्यासह जिल्हय़ातील रेशन दुकानदार उपस्थित होते.









