वार्ताहर /खानापूर
केंद्र व राज्य शासनाकडून गरिबांना मोफत मिळणारा रेशनचा तांदूळ काळाबाजार करण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. यापूर्वी अनेकवेळा अशा प्रकारवर कारवाई करण्यात आली आहे. तरीदेखील अनेक रेशन दुकानदार गरिबांच्या तोंडाचा घास चोरटय़ा मार्गाने बळकावत किंवा फसवत तो काळय़ाबाजारात विकण्याचे प्रकार वाढले आहेत. अशाचप्रकारे अळणावर-खानापूर रस्त्यावर एका वाहनातून रेशनच्या तांदळाची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची पक्की खबर नंदगड पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सापळा रचून वाहनासह तांदूळ जप्त करून मालासह टेंपो जप्त केला आहे. एका 407 मालवाहू वाहनातून रेशनचा हा तांदूळ काळय़ाबाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता. सदर टेंपोत 15 ते 20 रेशन तांदूळ पोती असल्याचे आढळून आले आहे. सदर तांदूळ कोणत्या ठिकाणाहून टेंपो भरण्यात आला. या पाठीमागे कोण सूत्रधार आहेत. याचा तपास नगर पोलिसांनी हाती घेतला असून या प्रकरणी वाहनमालक शांतीनाथ पाटील याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत.









