खडेबाजार पोलिसांची कारवाई, न्यायालयीन कोठडीत रवानगी
प्रतिनिधी/ बेळगाव
रेशन तांदळाचा काळाबाजार केल्याच्या आरोपावरुन शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. शेरी गल्ली येथे एका कॅन्टरमध्ये 30 क्विंटल रेशनचे तांदुळ जप्त करण्यात आले होते.
सुहास सुरेश पिळणकर (वय 40, रा. वडगाव), महादेव लक्ष्मण पाटील (वय 28, रा. धामणे), अहम्मद बशीरअहम्मद (वय 25, रा. विरभद्रनगर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. त्यांच्या जवळून 2 हजार 950 किलो तांदळाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. जप्त तांदुळ साठय़ाची किंमत 66 हजार 375 रुपयांइतकी होते. हा साठा सावंतवाडीला पाठविण्यात येत होता. खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.









