प्रतिनिधी / बेळगाव :
रेशन कार्डधारकांना कोणत्याही प्रकारचे ‘स्मार्ट कार्ड’ वितरीत करण्यात येत नसल्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने कळविण्यात आले आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन आपली फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्यावतीने ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना नव्याने स्मार्ट कार्ड स्वरुपात रेशनकार्ड देत असल्याचे सांगून काही व्यक्तिंकडून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार होत असल्याचे खात्याच्या निदर्शनास आले आहे. मात्र, अशा कोणत्याही प्रकारचे स्मार्ट कार्ड देण्यात येत नसल्याचे स्पष्टीकरण खात्याने केले आहे.
स्मार्ट कार्ड काढून देण्यासाठी केंद्र सरकारशी एका खासगी कंपनीने करार केल्याचे सांगून खासगी मुद्रण कंपनी आणि सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचे काम काही महाभागांकडून सुरू आहे. मात्र, अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने कोणत्याही प्रकारचे स्मार्ट कार्ड देण्यात येत नसून रेशन कार्डांसाठी ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची व्यवस्था सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी कळविले आहे.
रेशन कार्डासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित आहार निरीक्षकांच्या लॉग ईनला हा अर्ज जात असून संबंधित निरीक्षक तपासणी करून त्यानंतरच रेशनकार्ड मुद्रणासाठी खात्याद्वारे मणिपाल प्रेस संस्थेकडे पाठविण्यात येतो. तेथून रजिस्टर पोस्टद्वारे थेट अर्जदारांच्या घरी नवीन रेशन कार्ड पाठविण्याची व्यवस्था खात्याद्वारे सुरू आहे. यामुळे कोणीही खोटी माहिती तसेच फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.








