प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण बनत आहे. या वस्तू घेण्यासाठी अधिक दर आकारण्यात येत आहे. यामुळे बीपीएल तसेच अंत्योदय रेशन कार्डधारकांना दोन महिन्यांचे रेशन एकाच वेळी देण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र, रेशन घेण्यासाठी सर्वच दुकानांसमोर मोठी गर्दी होत आहे. दुकानदारांच्यावतीने सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी काही दुकानांसमोर हे प्रयत्न कमी पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे रेशन दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने या आधी तांदूळ आणि प्रत्येक बीपीएल कार्डधारकांना महिना दोन किलो याप्रमाणे एकूण चार किलो गहू देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सध्या केवळ तांदळाचे वाटप होत असल्याने कार्डधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता गव्हाचा पुरवठा झाला असला तरी वाहतूक अव्यवस्थेमुळे वेळेवर सर्व रेशन दुकानात गहू पोहोचला नसल्याने समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. मात्र, काही दिवसातच कार्डधारकांना गव्हाचा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
एकीकडे अंत्योदय आणि बीपीएल रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्याचे सांगण्यात येत असताना बऱयाच रेशन दुकानदारांकडून 20 रुपयांची मागणी होत आहे. प्रत्येक कार्डधारकांना दोन किलो तांदूळ कमी देण्यात येत असल्याच्या तक्रारी कार्डधारकांनी केल्या आहेत. यामुळे कार्डधारकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तांदळाचा पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांना दोन किलो तांदूळ कमी देत असल्याचे दुकानदार सांगत आहेत. याकडे खात्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. सुरक्षित अंतर राखण्याबरोबरच संपूर्ण महिनाभर रेशन पुरवठा सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









