प्रतिनिधी / बेळगाव
अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या घटकांना दर महिन्याला रेशनचा पुरवठा केला जातो. अंत्योदय आणि बीपीएल रेशन कार्डधारकांना एप्रिल महिन्यापासून ज्वारी (जोंधळा) वितरित करण्याची घोषणा शासनाने केली होती. मात्र, एप्रिल महिन्यात अद्याप ज्वारीचे वितरण झाले नाही. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेमुळे ज्वारीचे वितरण थांबले आहे.
गोरगरीब जनतेचा दर्जा उंचावावा व जीवनाश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, याकरिता शासनामार्फत दर महिन्याला अंत्योदय कार्डधारकांना 35 किलो तांदूळ तर बीपीएल कार्डधारकांना माणसी 5 किलो तांदूळ व दोन किलो गहू दिला जातो. एप्रिलपासून राज्य सरकारने रेशनवर ज्वारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोटनिवडणुकीमुळे लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या ज्वारीला मुकावे लागले आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी राज्यात एप्रिलपासून अतिरिक्त धान्याचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांतून समाधानाचे वातावरण होते. सध्या वाढत्या महागाईमुळे रेशनवरील ज्वारीने दिलासा मिळणार होता. मात्र, एप्रिलमध्ये ज्वारीचे वितरण झाले नाही. 17 एप्रिल रोजी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याकरिता आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे रेशनवरील ज्वारीचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. कुटुंबातील सदस्याला माणसी 5 किलो तांदूळ दिला जातो. मात्र, आता ज्वारी देण्यास सुरुवात झाल्यास यात बदल होणार आहे. प्रत्येक सदस्याला दोन किलो तांदूळ तर रेशनकार्डला दोन किलो गहू व दोन किलो ज्वारी वाटप केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.आहे.









