सात महिने उलटले तरी एकाही कार्डचे वितरण नाही
प्रतिनिधी /बेळगाव
गोरगरीब जनता उपाशी राहू नये, त्यांना पोटभर अन्न मिळावे, यासाठी रेशन वितरणाची व्यवस्था सुरू करण्यात आली. एपीएल, बीपीएल आणि अंत्योदय अशा प्रकारची वर्गवारी करण्यात आली. अनेक जण बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्ड मिळावे यासाठीच धडपड करत असतात. मात्र, 2021 साल सुरू झाल्यानंतर आतापर्यंत एकाही कार्डचे वितरण करण्यात आले नाही. याचबरोबर कार्ड वितरण प्रक्रिया कधी सुरू केली जाईल, याचीही शाश्वती देण्यात आली नाही. त्यामुळे रेशनकार्डसाठी अर्ज करूनही अनेक जण कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
2021 मध्ये आतापर्यंत 26 हजार 378 जणांनी अर्ज केले आहेत. त्या सर्व अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. मात्र, अजूनही ती कार्डे वितरित करण्यात आली नाहीत. सध्या कोरोनामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आहे. त्यांना रेशनची नितांत गरज आहे. मात्र, रेशनकार्ड नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. 2019-20 मधीलही 3 हजार 374 रेशनकार्ड अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. तातडीने या कार्डचे वितरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हय़ामध्ये तालुकानिहाय प्रलंबित असलेली रेशनकार्डे
| तालुका | दाखल अर्ज |
| अथणी | 4003 |
| बैलहोंगल | 1471 |
| बेळगाव | 5614 |
| चिकोडी | 2968 |
| गोकाक | 4162 |
| हुक्केरी | 1610 |
| खानापूर | 1058 |
| रायबाग | 2460 |
| रामदुर्ग | 1294 |
| सौंदत्ती | 1738 |
| एकूण | 26378 |









