भाजपची मागणी : खंवटे, सरदेसाईंचा शेट्टीशी संबंध काय?
प्रतिनिधी / पणजी
भाजपने काँग्रेससह गोवा फॉरवर्ड व अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्यावर रेव्ह पार्टी झवेरी प्रकरणी पलटवार केला असून चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवाय झवेरीचे गेल्या दोन तीन महिन्यातील फोन कॉल्स जाहीर जाहीर केल्यास त्याचे कोणाकडे संबंध आहेत. हे जनतेला कळेल असे सूचविले आहे. त्या पार्टी आयोजनात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी असे भाजपने म्हटले आहे.
आमदार विजय सरदेसाई, आमदार रोहन खंवटे यांची शेट्टी सोबतची छायाचित्रे भाजपने पत्रकार परिषदेत सादर केली. त्यांचा शेट्टीशी संबंध काय? याचा खुलासा त्यांनीच करावा अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे. पणजीतील पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले की, गोव्याचा पावलो एस्कोबार कोण? हे आता खंवटे यांनी सांगण्याची गरज आहे. रेव्ह पार्टीसाठी फंड कोठून येतो ते शोधा. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पोलिसांना अमंलीपदार्थ शोधण्यासाठी मुक्त स्वातंत्र्य दिले आहे म्हणून ती धाड पडली आणि अंमलीपदार्थ जप्त झाले. सावंत यांच्या कारकिर्दीत अशा अनेक धाडी पडल्या असून तशा धाडी काँग्रेसच्या काळात किती पडल्या? ते काँगेसवाल्यांनी सांगावे, अशी मागणीही नाईक यांनी केली आहे.
गोव्यातून अमलीपदार्थाचा नायनाट करण्यासाठी डॉ. सावंत झटत असून पोलीस खाते त्यांना चांगली साथ देत आहे. वागातोर रेव्ह पार्टीमागील खरा सूत्रधार कोण? याचा तपास पोलिसांनी लावावा आणि सत्य जनतेसमोर आणावे, असेही नाईक यांनी नमूद केले.
गोवा फॉरवर्डचे शिवोलीचे आमदार विनोद पालयेकारांच्या मतदारसंघात अशा रेव्ह पाटर्य़ा होतात. त्या रोखण्यासाठी त्यांनी काय केले? ते दोन वर्षे मंत्री होते तेव्हा त्यांनी त्या को रोखल्या नाहीत? अशी विचारणा नाईक यांनी केली. भाजपवर मुख्यमंत्र्यांसह त्यांनी विनाकारण चिखलफेक करू नये, असेही नाईक म्हणाले.