उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर
प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव तालुक्यातील कासावली, वेलसाव, माजोर्डा या भागात रेल्वे दुपदरीकरणाला विरोध होत असताना सरकारने त्या भागातील जमीन संपादीत करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याने गोंयचो एकवोट तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जमीन संपादीत करण्याची ही प्रक्रिया त्वरीत रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन या संघटनेने मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱयांना शुक्रवारी दुपारी दिले.
रेल्वेचे दुपदरीकरण हे केवळ कोसळसा वाहतुकीसाठी करण्यात येत असून सबंध गोव्यातून या दुपदरीकरणाला विरोध आहे. तरीही प्रशासनाने दुपदरीकरणासाठी भू संपादन करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. भू संपादन कायदय़ाखाली भू संपादन करण्यासाठी स्थानिक जमीन मालकांना शासकीय दरबारी हजेरी लावण्यासाठी बोलावण्यात आलेले आहे. सध्याच्या कोविड महामारीच्या दिवसांत असे बोलावणेचे गैर असल्याचे स्पष्ट करून लोकांचा या प्रक्रियेलाही विरोध असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
गोंयचो एकवोटचे ओलान्सीयो सिमोईस यांनी सांगितले की, 2013 सालीही भू संपादनाचा असाच प्रयत्न झाला होता. मात्र, लोकांनी तेव्हाही विरोध केला होता. रेल्वे दुपदरीकरण हा प्रकल्प गोव्याच्या हिताविरूध्द तसेच पर्यावरणाच्या रक्षणाविरूध्द असून या प्रकल्पालामुळे स्थानिक वारसा नष्ट होणार आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे कुणीच पाठींबा देणार नाही. सरकारने सुरू केलेली जमीन संपादीत करण्याची प्रक्रिया त्वरीत मागे घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यासंबंधी मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱयांना निवेदनही सादर करण्यात आले.









