पूर्णत्वासाठी 2022 उजाडणार : कोरोनामुळे रखडले काम
प्रतिनिधी/ बेळगाव
मिरज ते लोंढा या 186 कि. मी. लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. 2015-16 मध्ये हा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ऑक्टोबर 2019 पासून करण्यात आली. मार्च 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार केवळ 10 टक्के दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दुपदरीकरणाचे काम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकूण 7 टप्प्यांमध्ये दुपदरीकरणाचे काम केले जात आहे. 186 पैकी केवळ 16 कि.मी.चे चिकोडी ते घटप्रभा हे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम अद्याप सुरू आहे. मध्यंतरीच्या लॉकडाऊनमुळे कामगार आपापल्या गावी परतले होते. आता हे कामगार पुन्हा कामावर परतत असल्याने कामाला सुरुवात झाली आहे. मार्चपर्यंत केवळ 10 टक्केच काम पूर्ण झाल्यामुळे दुपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास अद्याप वेळ लागेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. याचा परिणार रेल्वे वाहतुकीवर होत असून, हे काम लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.
या दुपदरीकरणाच्या कामासाठी 1 हजार 190 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी 429 कोटी रुपये मार्चअखेर खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. हुबळी विभागीय रेल्वे अधिकारी अरविंद मालखेडे हे वारंवार दुपदरीकरणाचा अहवाल मागवून या मार्गाची पाहणी करीत आहेत. पुढील दोन वर्षात दुपदरीकरणाबरोबरच विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे









