पहिले रेल्वेगेट बंदमुळे वाहतूक कोंडी,नागरिकांचे हाल : गैरसोय दूर करण्यासाठी काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वे दुपदरीकरणाचे काम करण्यात येत असल्यामुळे पहिले रेल्वेगेट मंगळवारपासून बंद ठेवण्यात आले आहे. परंतु यामुळे दुसरे रेल्वेगेट येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सकाळी व संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रेल्वेगेट बंद असल्यामुळे नागरिकांना याचा फटका बसला. त्यांना दुरूस्ती सुरू असलेल्या कामामधूनच वाट काढत दुसऱया बाजूला यावे लागले.
मिरज ते लेंढा दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. यातील बेळगाव ते खानापूर या दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण केले जात आहे. सध्या असणाऱया रेल्वेमार्गाच्या शेजारीच दुसरा रेल्वेमार्ग घातला जात आहे. यासाठी पहिला माती टाकण्यात येत असून त्यावर खडी टाकण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 7 पर्यंत रेल्वे बंद ठेवली जाणार आहे.
मंगळवारी सकाळपासून रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले. त्यामुळे वाहतुकीचा भार दुसऱया रेल्वे गेटवर पडला. सकाळी 9 ते 11 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत दुसरे रेल्वेगेट येथे वाहतुकीची कोंडी झाली. काँग्रेस रोडमार्गे टिळकवाडी परिसरात जाणाऱया प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अशीच परिस्थिती तिसरे रेल्वेगेटनजीक होती. यामुळे कामावर जाणाऱयांना काहीसा विलंब झाला.
विद्यार्थ्यांचे होताहेत हाल
पहिले रेल्वेगेटच्या वरील भागात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. जे विद्यार्थी बसने पहिले रेल्वेगेट येथे उतरतात ते रेल्वेगेट पार करून शाळा महाविद्यालयापर्यंत जातात. या विद्यार्थ्यांना रेल्वेगेट बंद असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. दुसऱया पर्यायी मार्गाने रेल्वे मार्ग ओलांडून विद्यार्थी शाळेत जात आहेत. विद्यार्थ्यांसोबतच वयोवृद्ध नागरिकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे रेल्वे गेटचे काम लवकर पूर्ण करून तो सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.









