प्रतिनिधी / कणकवली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत ठेवण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय रेल्वे बोर्डाने रेल्वे सेवेसह सर्व व्यवहार 3 मेपर्यंत स्थगित ठेवले असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेसह मुंबईतील लोकलसेवा आधीच बंद करण्यात आली होती. त्यानंतर पंतप्रधानांनी 14 एप्रिलपर्यंत देशभर लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशातील सर्वच रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. मात्र, 14 नंतर 15 पासून रेल्वे आरक्षण तसेच रेल्वे सेवाही सुरू होईल, याबाबत अनिश्चितता होती. मात्र, मंगळवारी पंतप्रधानांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वे बोर्डानेही तातडीने सर्व प्रकारच्या रेल्वे सेवा या वाढीव लॉकडाऊनपर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, देशभरात कोरोनाचा जास्त फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर टेन, एसटी, खासगी बस अशा वाहतुकीच्या सर्व सुविधा 3 मेपर्यंत बंद करण्यात आल्याने यामुळे लाखो प्रवाशांचे रिझर्व्हेशन रद्द झाले आहे. रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे आधीच मन:स्ताप भोगाव्या लागलेल्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये म्हणून जे रिझर्व्हेशन रद्द झाले आहे, त्याचा परतावा उशिरात उशिरा 21 जूनपर्यंत देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, रेल्वे सेवा अचानक बंद केल्यामुळे जे प्रवासी रेल्वे स्टेशनवर अडकून पडले असतील, त्यांना रेल्वे स्टेशनवरील वेटिंग रुममध्ये राहण्याची सुविधा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. पंतप्रधानांच्या नव्या घोषणेनंतर त्या निर्णयातही वाढ करण्यात आली आहे.









