पोस्टमन सर्कलपर्यंत करावी लागते पायपीट : पुन्हा बसविणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानक परिसरात एटीएम नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पैशांसाठी पोस्टमन सर्कल अथवा खानापूर रोडवरील स्टेट बँक एटीएम गाठावे लागत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरातच एटीएम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
रेल्वेस्थानक आवारात दोन बँकांचे एटीएम होते. यामुळे प्रवाशांना परिसरातच पैसे मिळत होते. रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करताना दोन्ही एटीएम काढण्यात आले. सध्या बऱयाच वेळा प्रवासी जादाची रोख रक्कम प्रवासादरम्यान घेऊन जात नाहीत. येथील रेल्वेस्थानक परिसरात एटीएम नसल्याने प्रवाशांना इतरत्र पायपीट करावी लागत आहे.
प्रवाशांना सोयीचे होणार
सध्या रेल्वेस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरात पुन्हा एटीएम बसविणे गरजेचे आहे. बऱयाच एक्स्प्रेस पाच-दहा मिनिटांसाठी स्थानकात थांबतात. या दरम्यान प्रवाशांना पैसे काढण्यास वेळ असतो. त्यामुळे स्थानकाच्या अंतर्गत भागात एटीएम झाल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
रेल्वेस्थानक परिसरातच कारवार बसस्थानक आहे. येथून दररोज हजारो प्रवासी गोवा, सिंधुदुर्ग, कारवार तसेच ग्रामीण भागात ये- जा करीत असतात. या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण झाले असून, येथेही एटीएमची आवश्यकता भासत आहे. शहराच्या इतर भागात 100 मी.वर 1 एटीएम असताना रेल्वेस्थानक व बस स्थानकावर एटीएम उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एटीएमची सोय झाल्यास येथील हेस्कॉम कार्यालयात येणाऱयांचीही सोय होणार आहे.









