खासदार मंगला अंगडी यांची अधिकाऱयांना सूचना, कामाची केली पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वे विभागातील बेळगाव रेल्वेस्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून ग्राहकांना जास्तीत जास्त सोयी व्हाव्यात याकडे लक्ष दिले जात आहे. मुख्य प्रवेशद्वारासह दक्षिण प्रवेशद्वार, कोचिंग डेपो व यार्डचे काम सुरू आहे. डिसेंबर 2021 पर्यंत हे काम पूर्ण करावे, अशा सूचना खासदार मंगला अंगडी यांनी नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱयांना केल्या.
सोमवारी खासदार अंगडी व आमदार अनिल बेनके यांनी रेल्वेस्थानकाच्या कामाची पाहणी केली. प्रारंभी खासदार व आमदारांच्या हस्ते रेल्वेस्थानकावर बांधकामाचे काम करणाऱया कामगारांना अन्नपदार्थांच्या किटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रेल्वेस्थानकाची जुनी इमारत, प्लॅटफॉर्म यासह इतर कामांची माहिती घेतली. डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. परंतु त्यापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना खासदारांनी केल्या.
रेल्वे समुदाय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, बेळगाव रेल्वेस्थानकाला हायटेक करण्याचा संकल्प दिवंगत केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांनी केला होता. त्यामुळे अत्याधुनिक व सुसज्ज रेल्वेस्थानक व्हावे, यासाठी मेहनत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रेल्वेचे साहाय्यक विभागीय अभियंता महेश बराळे, मुख्य तिकीट निरीक्षक सुनील आपटेकर, तिकीट निरीक्षक जरीउल्ला, अनिल कुमार यांच्यासह इतर अधिकारीवर्ग उपस्थित होता.









