रेल्वे पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी \ बेळगाव
पॅसेंजर रेल्वेत प्रवास करणाऱया एका प्रवाशाचा मोबाईल चोरल्याच्या आरोपावरुन बेळगाव रेल्वे पोलिसांनी नंदिकुरळी (ता. रायबाग) येथील एका तरुणाला गुरुवारी अटक केली आहे. त्याच्या जवळून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
शेखर मल्लाप्पा कांबळे (वय 27, रा. नंदिकुरळी) असे त्याचे नाव आहे. तो व्यवसायाने ट्रक चालक असून बुधवारी रायबाग जवळ पॅसेंजर रेल्वेत पवन कांबळे (वय 18, रा. अर्जुनवाड, ता. हुक्केरी) या तरुणाचा मोबाईल चोरला होता. या प्रकरणी रेल्वे पोलीस स्थानकात भा.दं.वि. 379 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आले होते.
गुरुवारी शेखरला अटक करुन पोलिसांनी त्याच्या जवळून चोरीचा मोबाईल जप्त केला आहे. सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.









