प्रवाशांना मिळणार गरमागरम ‘खान-पान’ – कोरोनामुळे 18 महिन्यांपासून पँट्री सेवा बंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रेल्वे प्रवाशांना पुन्हा गरमागरम आणि ताजे-तवाने जेवण मिळणार आहे. रेल्वेने राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस आणि एक्स्प्रेस टेनमध्ये शिजवलेल्या जेवणासह खान-पान सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 27 डिसेंबरपासून टेनमध्ये केटरिंग सेवा सुरू होऊ शकते. याबाबतचे परिपत्रक रेल्वे बोर्डाने जारी केले आहे. विभागीय रेल्वे प्रदान केलेल्या सेवांच्या आधारे केटरिंग शुल्क आणि दर यादीची पडताळणी करणार असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
रेल्वेची प्रवासी सुविधा समिती पुन्हा ट्रेनमध्ये ऑन-बोर्ड केटरिंग सेवेसह इतर अनेक सुविधा पुन्हा सुरू करणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन 27 डिसेंबरपासून 50 ट्रेनमध्ये जेवणाची सुविधा सुरू करणार आहे. यामध्ये राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेस इत्यादींचा समावेश आहे. मागील वर्षी मार्चदरम्यान देशात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून पॅन्ट्री कॅटरिंगवर बंदी घालण्यात आली होती. त्यापासून मागील 18 महिन्यांपासून बंद असलेली पॅन्ट्री सेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. प्रवाशांना ट्रेनमध्ये जेवणासाठी वेगळे बुकिंग करावे लागणार नाही. प्रीमियम गाडय़ांमध्ये, तिकिटासह जेवणाची सुविधा उपलब्ध असेल, तर इतर गाडय़ांमध्ये प्रवासी पूर्वीप्रमाणे पैसे देऊन पँट्रीकडून जेवण किंवा नाश्ता घेऊ शकणार आहेत.
ऑनलाईन पेमेंटवर 50 रुपयांपर्यंत बचत

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशननुसार, यापूर्वी तिकीट काढलेल्या प्रवाशांना 27 डिसेंबरपासून जेवणासाठी ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा देखील दिली जाईल. तसेच प्रवासादरम्यान ऑर्डर केल्यासह ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केल्यास प्रतिप्रवासी 50 रुपयांपर्यंत बचत करू शकतात, असे आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे.
सध्या देशातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे अनेक निर्बंध हटविण्यात आले आहेत. रेल्वे आणि विमान प्रवासातील नियमही शिथिल करण्यात आले असून आता प्रवाशांचाही ओघ वाढत चालला आहे. त्यामुळेच रेल्वेमधील पूर्वीच्या सेवा हळूहळू सुरू करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. कोरोना कालावधीत प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी ‘आयआरसीटीसी’ने रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार गाडय़ांमध्ये ‘रेडी टू इट’ (तयार जेवण) देणे सुरू केले होते. पण बहुतांश प्रवाशांना ‘रेडी टू इट’ जेवण पसंतीस उतरले नाही. त्याबाबत आयआरसीटीसीला अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. कोरोनाकाळात पूर्वीच्या तुलनेत, फक्त 30 टक्के लोक टेनमध्ये जेवण खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. ‘आयआरसीटीसी’ 19 राजधानी, 2 तेजस, 1 गतिमान, 1 वंदे भारत, 22 शताब्दी, 19 दुरांतो आणि 296 मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये खान-पान सेवा पुरवते.









