ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गेले काही दिवस देशात रेल्वेच्या खासगीकरणावरून वाद सुरू आहे. यादरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी एक मोठे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रेल्वेचं कोणत्याही प्रकारे खासगीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.
पीयूष गोयल यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही. सध्या सुरू असलेल्या रेल्वेच्या सेवा त्याच मार्गाने धावतील. खाजगी सहभागासह 109 मार्गावर 151 अतिरिक्त आधुनिक रेल्वे चालवल्या जातील. ज्याचा रेल्वे गाड्यांवर काहीही परिणाम होणार नाही. परंतु गाड्यांच्या आगमनाने रोजगार निर्माण होईल. त्यामुळे रेल्वेचे कोणत्याही प्रकारे खासगीकरण केले जात नाही, सध्या सुरू असलेल्या रेल्वेच्या पूर्वीप्रमाणेच सर्व सेवा सुरू राहतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

109 जोडी मार्गांवर खासगी रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेने प्रस्ताव मागवले आहेत. संपूर्ण देशातील रेल्वेच्या जाळ्याला 12 कलस्टरमध्ये विभागण्यात आलं आहे. या 12 क्लस्टरमध्ये 109 जोडी मार्गांवर खासगी गाड्या चालवल्या जाणार आहेत. प्रत्येक रेल्वेला कमीतकमी 16 डबे असतील. तर या ट्रेनचा सर्वाधिक वेग हा 160 किलोमीटर प्रति तास असेल. या ट्रेनचा रोलिंग स्टॉक खासगी कंपनी खरेदी करेल.









