प्रतिनिधी /बेळगाव
गोगटे सर्कलपासून तिसरे रेल्वेगेटपर्यंत नैर्त्रुत्य रेल्वेने संरक्षक भिंत उभारली होती. सहा महिन्यांपूर्वी उभी केलेली संरक्षक भिंत मंगळवारी रात्री कोसळल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मुसळधार पावसाने दुसरे रेल्वेगेटजवळ भिंत कोसळली आहे. रात्रीच्यावेळी भिंत कोसळल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.
मध्यंतरीच्या काळात टिळकवाडी परिसरात रेल्वे रुळाखाली आत्महत्या करणाऱयांची संख्या वाढली होती. त्यामुळे या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. अखेर ही मागणी मान्य करत 2020 मध्ये गोगटे सर्कलपासून तिसरे रेल्वेगेटपर्यंत सिमेंटच्या ब्लॉकची संरक्षक भिंत उभारली. रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जात असल्याने भविष्यात रेल्वेची गती वाढणार आहे. त्यामुळे पुढील धोके टाळण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने ही संरक्षक भिंत उभारली आहे.
भिंत उभारून सहा महिने होण्यापूर्वीच या भिंतीचा काही भाग मंगळवारी कोसळला. काँग्रेस रोडवर फुटपाथला लागूनच ही संरक्षक भिंत उभारली होती. दररोज शेकडो नागरिक या फुटपाथवरून ये-जा करतात. विपेतेही साहित्य विक्रीसाठी तेथे बसलेले असतात. रात्री भिंत कोसळल्याने कोणतीही हानी झाली नाही.