फलटण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
प्रतिनिधी/ फलटण
जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरू असताना फलटण तालुक्यातील आकडेवारी ही धक्कादायक येत आहे. यातील अनेकांना बेड उपलब्ध होत नाहीत. तर बऱयाच रुग्णांना डॉक्टर रेमडीसीवीर देण्याचे सांगितले जात आहे. रेमडीसीवीरचा तुटवडा असल्यामुळे त्याचाच फायदा उठवत इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱया टोळीला बनावट गिऱहाईक बनून फलटण पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत सुविधा हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय सुनिल विजय कचरे (वय 38 रा. नेर पुसेगांव ता. खटाव जि. सातारा) याच्यासह अजय सुरेश फडतरे (वय 34 रा. पिंप्रद ता. फलटण), प्रविण मिस्त्राr ऊर्फ प्रविण दिलीप सापते (रा. घाडगेवाडी ता. फलटण) यांच्यासह त्यांच्या साखळीतील अनेकांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटणमध्ये रेमडीसीवीरचा काळाबाजार होत असल्याबाबतची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना मिळाली होती. येथील सुविधा हॉस्पीटलजवळ वॉडबॉय सुनिल विजय कचरे हा आर्थिक फायद्याकरीता रेमडीसीवीर अधिक किमतीने विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. ही अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक अरुण सखाराम गोडसे यांना फलटण पोलिसांनी सांगितली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम यांना बनावट गिऱहाईक बनवून पर्दाफाश करण्याची व्यूहरचना आखण्यात आली. रेमडीसीवीरची अधिक किमतीने विक्री करणाऱया इसमांचा मोबाईल क्रमांकावर इंजेक्शनसंदर्भात माहिती घेऊन 35 हजार प्रमाणे खरेदीबाबत बोलणे झाले. फोनवर बोलणाऱया समोरील इममाने मगर हॉस्पीटलचे पाठीमागे लक्ष्मीनगर फलटण येथे लवकरात लवकर येण्यास सांगितले.
त्याप्रमाणे औषध निरीक्षक अरुण सखाराम गोडसे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक एस. के. राऊळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, सहायक फौजदार एस. एन. भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. पी. ठाकूर, पोलीस नाईक एस. डी. सुळ, एन. डी. चतुरे, व्ही. के. लावंड, पोलीस शिपाई ए. एस. जगताप यांची फौज सदर ठिकाणी रवाना होवून सापळा लावून संशयितास थांबवले. तसेच बोगस गिऱहाईक अमोल कदम यांनी त्यांचे मोबाईलवरून विक्री करणारे इसमांचे मोबाईलवर कॉल केला असता त्याने पुढे काही अंतरावर मी एका मोटार सायकलवर बसलेलो आहे असे सांगितले. त्याप्रमाणे बनावट गिऱहाईक हे त्यांच्या खासगी गाडीवर जावून मोटार सायकलजवळ जावून त्या इसमांशी बोलला व रेमडीसीवीरच्या एका व्हायलची किंमत किती लागेल असे विचारले असता त्या इसमाने किंमत 35 हजार रूपये लागतील असे सांगितले. त्यांचे जवळील रेमडीसीवीर बनावट गिऱहाईकास 35 हजार रूपये किंमतीस विकत असताना त्यांचे मोबाईलची टॉर्च चालू केली असता पोलीस पथक व पंच, औषध निरीक्षक यांनी छापा टाकला. यावेळी इंजेक्शन विक्री करणारा इसम पळून जात असताना त्यास जागीच गराडा घालून पकडून ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक माहिती विचारली असता सुनिल विजय कचरे (वय 38) वर्षे व्यवसाय वॉर्ड वॉय सुविधा हॉस्पीटल फलटण (रा. नेर पुसेगांव ता. खटाव जि. सातारा), अजय सुरेश फडतरे (वय 34) व्यवसाय शेती (रा. पिंप्रद ता. फलटण जि.सातारा) ही नावे समोर आली.. सदरची इंजेक्शन कोठून आणली याबाबत विचारणा केली असता सदरचे हे प्रविण मिस्त्राr ऊर्फ प्रविण दिलीप सापते (रा. घाडगेवाडी ता. फलटण जि सातारा) यांच्याकडून आणली असल्याबाबत सांगितले. लगेच पोलीस पथक पाठवून प्रविण सापते यास ताब्यात घेतले असून त्यास विश्वासात घेवून तपास केला असता अन्य व्यक्तीचाही शोध लागला. या साखळीतील सर्व संशयितांना पोलिसानी गजाआड केले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक किंद्रे करीत आहेत.








