ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणारे ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात अथवा रुग्णाच्या उपचारांचा कालावधी कमी करण्यास परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
WHO चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमया स्वामिनाथन म्हणाले, भारतात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, अलिकडेच या औषधाच्या पाच वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून हेच समोर आले आहे की, ‘रेमडेसिवीर’ कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि रुग्णाचा उपचारांचा कालावधी कमी करण्यात परिणामकारक ठरत नाही.
या औषधाबद्दल कोणताही पुरावा नसताना जगभरात कोरोना रुग्णांवर या औषधाचा वापर करण्यात येतो. या औषधाच्या अनेक चाचण्या सुरू आहेत, असेही स्वामिनाथन म्हणाले.









