ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनावरील उपचारात वापरण्यात येणाऱ्या ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन आणि पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत या इंजेक्शनचे उत्पादन दरमहा 38.80 लाख युनिटवरून 74 लाख युनिटपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 21 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जीवन रक्षक औषधांचे अंतरिम वाटप आणि पुरवठा केला जाईल. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि आयात केलेले औषध टोक्लिजुमॅबच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्याच्या पुरवठ्यावर दबाव आहे. देशातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या सात परवानाधारक उत्पादकांची उत्पादन क्षमता दरमहा 38.80 लाख युनिटवरून मे 2021 च्या सुरुवातीपर्यंत 74 लाख युनिटपर्यंत वाढवण्यात येणार आहे.