एसपी अजयकुमार बंसल- रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील
प्रतिनिधी/ सातारा
रेमडेसिवीरचा फलटण येथे सुरु असलेल्या काळाबाजाराचे बिंग फुटले असतानाच आता सातारा शहरातीलही आणखी एक रॅकेट उध्वस्त करण्यात जिल्हा विशेष शाखेला (डीएसबी) यश आले आहे. कारवाईत पती, पत्नीला अटक करण्यात आली असून पती हा सातारा हॉस्पिटलमधील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱयांचा पर्दाफाश करण्याचे काम सुरु असून या लिंकमध्ये आणखी कोणा कोणाचा समावेश आहे? याचा तपास सुरु असल्याचे पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रशांत दिनकर सावंत (वय 29) व सपना प्रशांत सावंत (वय 25, दोघे रा. मंगळवार पेठ, सातारा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व औषधचे निरीक्षक अरुण गोडसे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवारी सायंकाळी साताऱयात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने सापळा लावला. याबाबतची माहिती अन्न व औषध विभागाला देवून त्यांना बोलावून घेतले. रात्री साडे आठ वाजता समर्थ मंदिर चौकात डीएसबीच्या पथकाने सापळा लावला असतानाच संशयित दोघे तेथे आले. पोलिसांनी दोन्ही संशयितांना तेथे थांबवून त्यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांना पाहताच संशयित पती व पत्नीची बोबडी वळली व त्यांनी रेमडेसिवीरची दोन इंजेक्शन असल्याची कबुली देवून ती पोलिसांकडे दिली.
यावेळी पोलिसांसोबत पंच व अन्न औषधचे अधिकारी सोबत होते. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर डीएसबीच्या पथकाने दोन्ही संशयितांकडे प्राथमिक चौकशी केली असता संशयित प्रशांत सावंत हा यादोगोपाळ पेठेतील समर्थ हॉस्पिटलमध्ये कर्मचारी असल्याचे कबुली त्याने दिली आहे. त्यांच्याकडे असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा परवाना तसेच स्वतः कडे कोणाच्या आदेशावरुन ठेवले आहे असे विचारताच तो निरुत्तर झाला.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप भोसले, हवालदार सागर भोसले, जयवंत खांडके, अश्विनी बनसोडे, तेजल कदम, सुमीत मोरे, निलेश बच्छाव, अनिकेत अहिवळे, राहूल वायदंडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.









