ऑनलाईन टीम / जालना :
कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारने नवा प्लॅन आखला आहे. त्यानुसार दोन पद्धतीत या इंजेक्शनचे वाटप करण्यात येणार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना येथील खासगी कोविड रुग्णालयांना ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर बोलताना टोपे म्हणाले, ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांकडून निविदा पद्धतीने सरकारच्या वतीने हाफकीन कंपनी टेंडर काढून हे इंजेक्शन खरेदी करणार आहे. त्यानंतर सरकारी रुग्णालयांना याचा पुरवठा होईल.
तसेच प्रत्येक जिह्यात एक स्टॉकिस्ट असणार असून, त्याला या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्हाधिकारी खासगी रुग्णालयांची इंजेक्शनची गरज लक्षात घेऊन इंजेक्शनचा पुरवठा करतील. या वाटपावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण राहील. त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही आणि तुटवडा निर्माण होणार नाही, असेही टोपे म्हणाले.