ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय रिर्झव्ह बँकेच्या (RBI) द्विमासिक पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज संपली. या बैठकीत अर्थव्यवस्थेतील सुधारणांवर चर्चा करण्यात आली. तसेच सलग आठव्यांदा व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रेपो रेट चार टक्क्यांवर कायम आहे. रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ईएमआय किंवा कर्जाच्या व्याजदरावर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यासंदर्भात माहिती दिली.
दास म्हणाले, कोरोना महासाथीच्या सुरुवातीपासून रिसर्व्ह बँकेने 100 हून अधिक उपाययोजना केल्या. महागाईची स्थिती अपेक्षेपेक्षा अनुकूल आहे. अर्थव्यवस्था काहीशी सावरली आहे. विकासाच्या बाबतीतही सकारात्मक चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येईल. दरम्यान, देशाचा विकासदर चालू आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये ९.५ टक्क्यांवर राहील, असा अंदाज आहे. दुसऱ्या तिमाहीत ७.९ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.१ टक्के असा विकासदर राहील, असेही दास म्हणाले.