आरबीआयचे पतधोरण : ‘जीडीपी’ यंदाच्या आर्थिक वर्षात 9.5 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ मुंबई
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरण जाहीर करताना रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतेही बदल न केल्याने ते जैसे थे म्हणजेच अनुक्रमे 4 टक्के आणि 3.3 टक्के राहतील, असे स्पष्ट केले. 2020-21 मध्ये वास्तविक जीडीपी 9.5 टक्क्मयांनी घसरण्याची शक्मयता आहे. परंतु अर्थव्यवस्था वेगाने सावरण्याचीही शक्यता आहे, याकडे आरबीआयने लक्ष वेधले आहे.
पहिल्या तिमाहीतील भरीव आकुंचन मागे पडले आहे, आता झळाळी दिसून येत आहे, असे दास यांनी पतधोरण समितीच्या निर्णयांची माहिती देताना सांगितले. देशाची मनोवृत्ती आता भीतीपासून आशेकडे वळली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अनेक क्षेत्रांच्या सावरण्याच्या प्रक्रियेवर भाष्य करताना दास यांनी तीन प्रकारच्या वेगांनी ही प्रक्रिया होईल असे सांगितले. ‘आपण नेहमीच आशावादी राहण्याचे धैर्य केले आहे आणि महामारीवर विजय मिळविण्याच्या मानवजातीच्या क्षमतेवर ठाम विश्वास ठेवला आहे. गेल्या काही महिन्यांत जेव्हा कोविड-19 जगभर फैलावला तेव्हा आमचा आशावाद वादळातील ज्वालेसारखे चमकत होता. आज वाऱयाने वेगळे वळण घेतले आहे. अत्यंत निराशाजनक काळात सुद्धा उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणे मूर्खपणाचे नाही याचे संकेत त्याने दिलेले आहेत, असे ते म्हणाले.
नव्याने स्थापन झालेल्या पतधोरण समितीची ही पहिली बैठक होती. या समितीत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्या असलेल्या आशिमा गोयल, नॅशनल कौन्सिल फॉर ऍप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चचे ज्ये÷ सल्लागार शशांक भिडे, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद यांचे प्राध्यापक जयंत वर्मा, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा, आरबीआयचे कार्यकारी संचालक मृदुल सागर आणि गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा त्यात समावेश आहे. भाववाढीला निर्धारित उद्दिष्टाच्या आत ठेवताना वाढीला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि कोविड-19 चे अर्थव्यवस्थेवरील परिणाम घटविण्यासाठी जैसे थे परिस्थिती जितका काळ ठेवण्याची गरज भासेल तितका काळ ठेवली जाईल, असे पतधोरण समितीने म्हटले आहे.








