वृत्तसंस्था/ मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील फ्रान्सची कंपनी रेनॉ यांनी अलीकडेच भारतात 8 लाख वाहनांची विक्री करण्याचा माईलस्टोन गाठला आहे. महत्त्वाचे म्हणजे या विक्री झालेल्या गाडय़ा या मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आल्या असल्याचे रेनॉने म्हटले आहे.
कोरोनाच्या काळातील परिस्थितीशी सामना करतानाच पुरवठय़ातील व्यत्ययाचा सामना कंपनीने समर्थपणे केला आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतातील वाहन विक्रीचा वाटा हा कंपनीसाठी खास राहिला आहे. गेल्या काही वर्षात आम्ही भारतात चांगलाच जम बसवू शकलो आहोत. उत्तम वाहन आणण्याचे धोरण कंपनीने मनापासून राबवून ग्राहकसेवाही उत्तमरितीने पार पाडली आहे, असे रेनॉ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच देशाचे मुख्य वेंकटराम ममीपल्ले यांनी म्हटले आहे.
किगरची लोकप्रियता वाढली
कंपनीच्या कार विक्रीत अलीकडच्या काळात किगर या गाडीची लोकप्रियता अधिक वाढली असल्याचे दिसले आहे. 4 लाख किगर वाहनांची विक्री आजवर झाली आहे, हाही एक प्रकारचा विक्रम आहे. अधिकतर मोटारी या मेक इन इंडियाअंतर्गत भारतातच उत्पादीत केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत आपल्या सेवेत 150 नवी सुविधा केंद्रे समाविष्ट केली आहेत.









