महाडिक गटाचे प्रतासिंह पाटील-कावणेकर यांचा प्रश्न
कोल्हापूर / प्रतिनिधी
गोकुळच्या मागील सत्ताकाळातील हिशेब विचारल्यास तो देताना दमछाक होईल, असे म्हणणाऱया संचालिका अंजना रेडेकर यांच्याकडे गेल्या 30 वर्षातील गोकुळचा हिशेब आहे का, असा प्रश्न महाडिक गटाचे प्रतासिंह पाटील-कावणेकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे. तसेच या 30 वर्षात प्रदीर्घकाळ अध्यक्षपद भुषविलेले ज्येष्ठ संचालक आज तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा आवर्जुन हिशेब विचारण्याचे आवाहन पाटील यांनी पत्रकात केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळमध्ये सध्या सुरु असलेल्या कारभाराबाबत केलेले आरोप कागदोपत्री खोडून काढणे शक्य नसल्याने सत्ताधाऱयांकडून पत्रकबाजी करत जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. पशुखाद्य वाहतुकीला वाहने घेवून संघाचे आर्थिक नुकसान केल असा आरोप महाडिक यांनी केलेला नाही. हि वाहने घेताना सहकाराचे नियम पाळले का, निविदा प्रक्रीया का राबविली नाही, एका ठराविक कंपनीलाच काम देण्यात कोणाचा आर्थिक लाभ आहे आदी प्रश्न महाडिक यांचे होते. मात्र या प्रश्नांची उत्तरे देण्यास सत्ताधारी टाळाटाळ करत आहेत. यानिमित्ताने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या टँकरवर टिका करणाऱयांचा चेहरा जनतेसमोर आला आहे. महाडिक यांचे टँकर रितसर निविदा प्रक्रीया पूर्ण करुनच घेतलेले आहेत. त्यामुळे आजही त्यांचे टँकर संघाकडे दूध वाहतुकीला आहेत.
गडमुडशिंगी आणि कागल येथील संस्थांचे संकलन राजकीय द्वेषातून बंद केले आहे. संचालकांच्या शिफारशीचा पायंडा गेली 30 वर्ष असला तरी याचा गैरफायदा मागील काळात कोणत्याही संचालकाने घेतला नाही. संघात राजकारण न आणता कारभार चालवल्याने आज संघ 5 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत पोहचला आहे. रेडेकर यांच्याकडे जर 30 वर्षांचा हिशेब असेल तर तो त्यांनी जरुर मांडावा. तसेच सध्या तुमच्या सोबत असलेल्या दोन ज्येष्ठ संचालकांनाही हिशेबा विचारावा. तसेच शौमिका महाडिक अर्धवट माहितीच्या आधारे गोकुळची बदनामी करत आहेत, असा आरोप करण्यापेक्षा त्यांनी मागितलेली माहिती गोकुळने रितसर सविस्तरपणे महाडिक यांना द्यावी. पत्रकबाजी करण्यापेक्षा महाडिक यांनी विचारलेल्या प्रश्नांची कागदपत्रे सत्ताधाऱयांनी जनतेसमोर ठेवावित, असे आवाहन पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.