वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शाओमीचा रेडमी नोट टेन सिरीज अंतर्गतचा स्मार्टफोन पुढच्या महिन्यामध्ये लॉन्च होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रेडमी नोट 10 व रेडमी नोट 10 प्रो हे दोन स्मार्टफोन्स फेब्रुवारी महिन्यामध्ये लाँच केले जाणार आहेत.
शाओमीने अलीकडे स्मार्टफोन्सच्या क्षेत्रात चांगली लोकप्रियता मिळवली आहे. विशेषतः भारतीयांनी या कंपनीच्या स्मार्टफोन्सना पसंती दर्शवली असल्याचे दिसून आले आहे. स्मार्टफोनच्या बाजारामध्ये आपले बस्तान अधिक चांगल्या रीतीने बसवण्याचा प्रयत्न येणाऱया काळात कंपनी करणार आहे. यासोबतच कंपनी एमआय 11 आणि एमआय 11 लाईट हे स्मार्टफोन्सही दाखल करण्याची तयारी करत आहे. एमआय 11 हा फोन ग्रे आणि निळा या रंगामध्ये येणार असून 8 जीबी रॅम व 128 आणि 256 जीबी स्टोरेजचा पर्याय या फोनमध्ये असेल. एमआय 11 लाईटमध्ये 6 जीबी रॅम व 64 जीबी तसेच 128 जीबी स्टोरेजचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सदरचा फोन हा काळा, गुलाबी आणि निळय़ा रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.









