भवानीनगर / इस्लामपूर
कोल्ह्याला द्राक्षे आंबट,अशी म्हण प्रचलीत आहे. परंतू वाळवा तालुक्यातील येथील रेठरेहरणाक्ष द्राक्ष बागायतदारांनी कष्टाने पिकवलेली व विक्रीसाठी जाणारी द्राक्षे सांभर आणि हरिणांनी फस्त केली. सांबरांनी द्राक्ष बागेची स्टीलची जाळी तोडून द्राक्ष शेतीचे अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये ८० गुंठे क्षेत्रावरील सुपर सोनाकाची बाग-बाग फस्त करुन पिकाची नासधूस झाली आहे. मात्र वनखात्याचे दुर्लक्षाचा नुमना पुढे येत आहे. रेठरेहरणाक्ष येथील रुपाली मधुकर माळी यांची रेल्वे लाईनच्या परिसरातील म्हसोबा दरी या परिसरात ८० गुंठे द्राक्ष शेती आहे. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून मोठया कष्टाने फुलविलेली द्राक्षबाग दुर्दैवाने सांभर व हरिणांच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.
या बागे भोवती असलेली स्टीलची जाळी तोडून हरिण वसांबरांनी बागेत प्रवेश केला आहे. तसेच त्यांच्या द्राक्षबागेलगतच असणारा मोहन शामराव पवार यांचा २ एकर ऊस महेश पवार यांचे एक एकर उन्हाळी सोयाबीन, प्रमोद पांडूरंग पवार यांचा ३० गुंठे गहू महेश राजाराम पवार यांचा तीन एकर झुकीनी जातीचा भाजीपाला, दोन एकर रसबेरी जातीची पपई, जयसिंग राजाराम मोरे यांचे एक एकर खोडवा ऊस याचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वनखात्याचे दुर्लक्ष होत आहे. तसेच जेमतेम मोबदल्यात शेतकरी शेती व्यवसाय करत असताना प्राण्यांनी हाता- तोंडाला आलेल्या पिकाची नासधुस केल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचं कसं हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन होत आहे.