मध्य प्रदेशात जाण्याआधीच मृत्यूने गाठले : जालना-औरंगाबाद लोहमार्गावरील घटना : मालगाडीने मजुरांना चिरडले
प्रतिनिधी / औरंगाबाद, पुणे
लॉकडाऊन काळात जालन्यात अडकून पडलेले मजूर मध्य प्रदेशात पोहोचण्यासाठी औरंगाबादकडे जात असताना काळाने त्यांच्यावर क्रूरपणे झडप घातली. काही किलोमीटरच्या पायी प्रवासानंतर विश्रांतीसाठी रुळावर झोपलेले असताना मालगाडीखाली चिरडून या 16 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 3 जण जखमी झाले. मन सुन्न करणारी ही दुर्घटना औरंगाबाद-जालना लोहमार्गावर करमाडजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने अनेक कामगार, नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. जालन्यातील एका कंपनीत कामाला असलेले 21 मजूरही मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी रात्री रेल्वेरुळावरून औरंगाबादकडे जात हेते. काही किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर हे सर्वजण थकले. त्यामुळे मध्यरात्री ते रेल्वेरूळावरच झोपले. ते झोपेत असतानाच काही कळायच्या आतच पहाटे पाचच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱया रिकाम्या मालगाडीने त्यांना चिरडले. या भीषण दुर्घटनेत 16 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. जखमींना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भयंकर होता, की रेल्वेरूळावर अक्षरश: रक्तामांसाचा सडाच पडल्याचे पहायला मिळाले. देश कोरोनाशी झगडत असताना झालेल्या अपघाताने महाराष्ट्रासह अवघा देश सुन्न झाला.
थकल्याने डोळा लागला अन् ….
काही प्रत्यक्षदर्शींनी आपल्यावर कोसळलेल्या या संकटाची दाहकता सांगितली. रुग्णालयात दाखल असलेला मजूर म्हणाला, आम्ही चालून चालून खूप थकलो होतो.
त्यामुळे लगेचच डोळा लागला. आम्ही रूळापासून थोडे दूर होतो. पाठीवर पिशवी टाकली आणि तसेच झोपलो. मालगाडीचा आवाज ऐकूच आला नाही. जेव्हा मालगाडी पुढे जाऊ लागली, तेव्हा तिने बॅग खेचत नेली. जीव वाचला. मात्र, जखमी झालो. जे बॅग घेऊन ट्रकच्या मध्यभागी झोपले होते, त्यांचा मालगाडीखाली सापडून मृत्यू झाला.
नि गाडी व वेळ निघून गेली…
एकाने कैफियत मांडताना सांगितले, कंत्राटदाराने पैसे देण्यास नकार दिला. 7 मेपर्यंत पैसे मिळतील, असे तो बोलला होता. पण, ते काही मिळाले नाहीत. एकीकडे मध्यप्रदेशातील आमच्या कुटुंबीयांना आमचा घोर लागून राहिलेला. त्यात ही चिंता. पास बनविण्याचे प्रयत्नही विफल झालेले. कुठलाच उपाय दिसेना. त्यामुळे रेल्वेरूळावरून प्रवास सुरू केला. औरंगाबादला पोहोचल्यानंतर पुढचा मार्ग ठरवू, असे आम्ही ठरवले. जालन्याहून गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता निघालो. अनेक किमी प्रवास केला. रात्री उशिरा थकल्यावर आमचे साथीदार काही अंतरावर रूळांवर बसू लागले. मी सहकाऱयांना रूळापासून दूर रहाण्यास सांगितले. पण पुढे गेलेले साथीदार रुळावरच बसले आणि त्यांचा डोळा लागला. आम्हाला मालगाडी येताना दिसली. मालगाडीच्या चालकाने हॉर्न वाजवला. आम्हीही सहकाऱयांना आवाज दिला. त्यांना तो ऐकायला गेला नाही. आम्ही पळत जाईपर्यंत गाडी आणि वेळ दोन्ही गोष्टी निघून गेल्या होत्या..
सर्व मजूर मध्य प्रदेशचे
मृतांपैकी सर्वजण हे मूळचे मध्य प्रदेशातील आहेत. धनसिंह रोड, निरवेशसिंह गोंड, बुद्धराज सिंग गोंड, रबींद्रसिंग गोंड, अच्छेलाल सिंह, सुरेशसिंह कौल, राजबोहरमसिंह, धर्मेंद्रसिंह गोंड, बिगेंद्रसिंह, प्रदीपसिंह गोंड, ब्रिजेश भयादिन, संतोष नापित, मुनीमसिंग, श्रीदयाल सिंह, नेमशाहसिंह, दीपकसिंह गोंड यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर तिघे जखमी आहेत. मजुरांकरिता भुसावळहून स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार असल्याचे त्यांना कळाले होते. आधी औरंगाबादला जाऊ, या उद्देशाने ते निघाले असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.









