सेलिब्रिटी कलाकार त्यांच्या आयुष्यातील सेलिब्रेशनवर अमाप खर्च करतात हे जरी खरं असलं तरी कोरोनामुळे आता प्रत्येकालाच परिस्थितीचे भान आले आहे. गेल्या वर्षभरात अनेक सेलिब्रिटी कलाकारांनी विवाह केला. मोजक्मया लोकांच्या उपस्थितीत लग्न करून सेलिब्रिटी कलाकारांनी कृतीतून संदेश दिला. त्यामुळे त्यांचे चाहतेही त्यांच्यावर खुश झाले. अभिनेत्री रूचिता जाधव हिच्यावर तिचे चाहतेही खुश तर झालेच पण तिचा अभिमान वाटतो अशा शब्दात प्रतिक्रियाही दिल्या आहेत कारण रूचिताने कामच असे केले आहे की तिचा प्रत्येकाला अभिमान वाटेल. रूचिताने तिच्या लग्नाचा संगीतसोहळा रद्द करून त्या खर्चात पाचगणी गावातील दीडहजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किराणा सामानाची मदत केली. नव्या संसाराची सुरूवात करण्यापूर्वी रूचिता आणि तिचा पती आनंद यांनी गोरगरीबांचा मोडलेला संसार उभा करण्यासाठी दिलेला हा मदतीचा हात नक्कीच कौतुकास्पद आहे.
लव्ह लग्न लोच्या या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या रूचिताचा आनंद माने या मुंबईतील व्यावसायिकाशी 3 मे रोजी विवाह झाला. लॉकडाउनमध्ये मुहूर्त असल्याने मोजक्मयाच लोकांच्या उपस्थितीत पाचगणी येथे लग्नाची तयारी सुरू होती. ग्रहमुख शांतीच्या विधीपासूनच रूचिताने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायला सुरूवात केली. लग्नात तिने आईचा शालू नेसायचे ठरवले होते, त्याप्रमाणे अक्षता पडताना रूचिताच्या अंगावर आईचा शालू होता. तिची ही पोस्टही खूप व्हायरल झाली होती. पाचगणी येथील घरातच सर्व विधी करण्यात आले आहेत.









