युरोप, आफ्रिकेत नवी कोरोना लाट येण्याच्या शक्यतेने चिंता, जागतिक आरोग्य संघटनेकडून दक्षतेचा इशारा
गेल्या दोन आठवडय़ांमध्ये काहीशी रोडावलेल्या कोरोना रूग्णांच्या जागतिक प्रतिदिन संख्येने पुन्हा 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी ही संख्या 3 लाख 30 हजार इतकी होती. युरोप आणि आफ्रिकेत या विषाणूची नवी लाट येण्याच्या शक्यतेने चिंता वाढली आहे. लवकरच हिंवाळय़ाला प्रारंभ होणार असून कडाक्याच्या थंडीचा हा कालावधी कोरोनासाठी सर्वात धोकादायक मानला जातो.
युरोपात फ्रान्स, इटली, बेल्जियम, स्पेन, जर्मनी आणि ब्रिटन या देशांमध्ये रूग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात या देशांमधील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला होता. मात्र, हिंवाळा जसजसा जवळ येत आहे, तशी नव्या रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मोठय़ा प्रमाणावर या रोगाचा प्रादुर्भाव होईल अशी शक्यता आहे.
पुन्हा लॉकडाऊन आणि संचारबंदी

फ्रान्सने राजधानी पॅरिसच्या काही भागात पुन्हा रात्रीची संचारबंदी सुरू केली आहे. तर बेल्जियम या देशात काही ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून बाजारपेठा बंद ठेवण्याचा आदेश स्थानिक पातळीवर देण्यात आला आहे. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये लोकांच्या भेटीगाठी घेण्यावर नव्याने बंधने लादण्यात आली आहेत. नेदरलँडस्मध्ये बार आणि उपाहारगृहे बंद करण्यात आली तर झेकोस्लोव्हाकियात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
आफ्रिकेतही कठीण परिस्थिती
आफ्रिका खंडाच्या जवळपास सर्व देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा पसरू लागल्याचे दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिका देशात रूग्णसंख्येत प्रतिदिन 1000 हून अधिकने वाढ होत आहे. आफ्रिकेत मृत्यूदरही जास्त आहे. याशिवाय मध्य आफ्रिकेतील काही देशांमध्ये चाचण्यांची व्यवस्था पुरेशी नसल्याने कोरोना बाधितांची संख्या नेमकी किती यासंबंधी अनुमान करणेही अशक्य झाले आहे.
दक्षिण अमेरिकेतही वाढ
पेरू, चिली, युरूग्वे आदी दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये रूग्णसंख्या काही प्रमाणात वाढू लागली आहे. तेथेही हिंवाळय़ात अनेक देशांच्या प्रशासनांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची स्थिती आहे. या खंडातील अर्जेंटिनात स्थिती नियंत्रणात असली तरी अद्याप चिंतामुक्त वातावरण निर्माण झालेले नाही, असे सांगण्यात येते. ब्राझीलमध्ये आधीच जास्त असलेली रूग्णसंख्या आता पुन्हा प्रतिदिन 10 हजार या गतीने वाढत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या लाटेसंबंधी इशारा दिला आहे. रासायनिक संरचनेत परिवर्तन करून नव्या स्वरूपात बाजारात आणलेली जुनी जिवाणूविरोधी औषधे कोरोनावर फारशी परिणामकारक ठरत नाहीत, असे दिसून आल्याचेही या संस्थेने स्पष्ट केले आहे. कोरोनावरची खात्रीशीर लस अद्यापही दृष्टीपथात नाही, अशा स्थितीत जनतेने आणि विविध देशांच्या प्रशासनांनी आरोग्य विषयक नियमांचे पालन करून स्वतःचे संरक्षण करावे, असे सांगण्यात आले. हा इशारा गांभीर्याने घ्यावा असे आवाहन कण्रण्यात आले.









