चंदूर / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील मौजे रुई गावच्या सरपंचांचा जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आला आहे. गावच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या जानेवारी 2021 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर करिष्मा मुजावर यांची सरपंच पदी निवड झाली होती.
जानेवारी 2021 मध्ये पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यामध्ये विद्यमान सरपंच करिष्मा मुजावर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडीला 11 जागा मिळाल्या होत्या. तर विरोधी परिवर्तन महाविकास आघाडी ला सहा जागा मिळाल्या होत्या. रुई ग्रामपंचायतीचे सरपंचपद इतर मागास महिलांसाठी आरक्षित होते. यातूनच विद्यमान सरपंच करिष्मा मुजावर यांना संधी देण्यात आली होती.
परंतू, त्यांचा जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार विरोधी गटातील दीपक साठे यांनी केली होती. याबाबत दोन्ही बाजूंची म्हणणे ऐकून घेऊन सुनावणी झाली असता जात पडताळणीमध्ये त्यांचा दाखला अवैध ठरविण्यात आला आहे. याबाबतचे निकालाचे पत्र दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी प्राप्त झाले आहे. याबाबत सरपंच करिष्मा मुजावर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली आहे.









