ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमधील 26 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 19 परिचारिकांचा समावेश असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोटे यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे दोन्ही शहरात लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर 7 दिवस सील करण्यात आले आहे.
राज्यात आज सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार 472 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4676 वर पोहचली आहे. तर 232 जणांचा मृत्यू झाला आहे. 572 जण या आजारातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.








