रामदेव बाबांनी फेडलं कर्ज : रुची सोया आता पतंजली फूडस्
मुंबई
बाबा रामदेव यांची कंपनी रुची सोया यांनी बँकांचे 2925 कोटी रुपये परतफेडीच्या माध्यमातून दिले आहेत. याचाच अर्थ रुची सोया ही रामदेव बाबांची कंपनी आता कर्ज मुक्त झाली आहे. रुच सोयाने अलीकडेच आपल्या एफपीओमार्फत 4300 कोटी रुपये जमविले होते. खाद्य तेल बनविणाऱया रुची सोयाने याच रकमेतून वरील कर्जाची रक्कम पूर्णपणे भरली असल्याचे समजते.
पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी ट्विट करून वरील माहिती दिली आहे. त्यात त्यांनी रुची सोया कंपनी आता कर्जमुक्त झाल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी कंपनीच्या समभागाच्या भावांनी 900 चा टप्पा पार केला होता. कंपनीचा समभाग शेअर बाजारामध्ये 924 रुपयांवर व्यवहार करत होता. एकाच दिवसामध्ये सदरचा कंपनीचा समभाग 13 टक्के इतका वाढल्याचे दिसून आले.
नाव बदलणार
रुची सोया इंडस्ट्रिजच्या संचालक मंडळाने कंपनीचे नाव बदलून पतंजली फूडस् करण्याला मान्यता दिली आहे. रविवारी झालेल्या बैठकीत नामकरणाला मान्यता दिल्याची माहिती सोमवारी शेअर बाजाराला देण्यात आलीय.