प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा रुग्णालयातून पळालेला कोरोनाबाधित व्यक्ती खटावमधील नातेवाईकांकडे मुक्कामी असल्याची माहिती रुग्णालयातील पोलीस चौकीमध्ये कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार अजय गोसावी यांनी दिली. संबंधित व्यक्तीबाबत त्याच्या कुटुंबियांना माहिती होती मात्र त्यांनीच ही माहिती लपवली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीच्या चौकशीनंतर त्याला क्वारंटाईन करायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
शिरवळ, ता. खंडाळा येथील 70 वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्याच्यावर शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले असता त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती समजताच त्याच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर वार्ड क्रमांक 2 मध्ये उपचार सुरू होते. दि. 6 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास संबंधित व्यक्ती रुग्णालयातून निघून गेला.
रुग्णालय प्रशासनाने याबाबत रितसर पोलिसात तक्रार न करता रुग्णालयातील पोलीस चौकीत तोंडी दिली होती. त्यामुळे या घटनेबाबत कोणाला काहीही समजले नाही मात्र डॉ. आमोद गडीकर यांनी संबंधित कर्मचाऱयांची चांगलीच झाडाझडती घेतली होती. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाची संपर्क साधत संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीची चौकशी केली असता प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
प्रशासनाने रुग्णालयातील पोलीस चौकीत कार्यरत असणारे सहाय्यक फौजदार अजय गोसावी, पोलीस कर्मचारी पवार, बनकर यांच्याकडे त्या पळून गेलेल्या व्यक्ती बाबत चौकशी केली असता त्यांनी रुग्णालय प्रशासनाने त्या व्यक्तीबाबत अत्यंत अपुरी माहिती दिली तसेच तक्रार दाखल केले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र तरी देखील सहाय्यक फौजदार अजय गोसावी यांनी रविवारी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या त्या व्यक्तीच्या कुटुंबियांचा मोबाईल नंबर मिळवून फोन केला असता संबंधित व्यक्तीच्या सुनेने ती व्यक्ती खटाव येथील नातेवाईकांकडे असल्याची माहिती पोलिसांना दिली. संबंधित व्यक्ती सुखरूप असल्याने जिल्हा रुग्णालयातील पोलिसांसह रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.








