डॉ.केतन भाटीकर यांचा इशारा
प्रतिनिधी / फोंडा
फोंडय़ात कोविड इस्पितळ उभारण्यास आमचा विरोध नाही, पण आधी उपजिल्हा म्हणजेच आयडी इस्पितळावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील रुग्णांची सोय योग्य जागी करा अशी मागणी फोंडय़ातील मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत इस्पितळाच्या आवारात आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण मांडली होती.
उपजिल्हाधिकारी केदार नाईक व फोंडा पोलिसांनी रात्री डॉ. भाटीकर यांच्याशी या विषयावर चर्चा करून फर्मागुडीतील दिलासा इस्पितळात पर्यायी सोय करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते मागे हटले. उपजिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुवेलकर यांनी आयडी इस्पितळातील सर्व सेवा व सुविधा दिलासामध्ये रुग्णांना मिळतील याची हमी दिली. रविवारी सायंकाळी आयडी इस्पितळाचे कोविड इस्पितळात रुपांतर करण्यासाठी तातडीने हालचाली सुरु झाल्या. त्यामुळे इस्पितळात उपचार घेणाऱया रुग्णांना एक तर घरी किंवा गोमेकॉत जाण्याचा सल्ला देण्यात आला. या प्रकाराची माहिती मिळताच मगो नेते सुदिन ढवळीकर व डॉ. केतन भाटीकर यांच्यासह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते व नागरिक इस्पितळाच्या आवारात जमले. फोंडा तालुक्यातील रुग्णांसाठी आधी पर्यायी सोय करा व नंतरच इस्पितळ खाली करा या मागणीवर जोर देत, इस्पितळातील एकाही रुग्णाला दुसऱया जागी हलविण्यास त्यांनी विरोध केला. आरोग्य खात्याचे संचालक डॉ. ज्यो डिसा हेही यावेळी उपस्थित होते. डॉ. भाटीकर व त्यांचे कार्यकर्ते आपल्या या भूमिकेवर ठाम राहिल्याने, रविवारी रात्री 10.30 वा. उपजिल्हाधिकारी केदार नाईक, पोलीस उपअधीक्षक नेल्सन आल्बूकर्क, निरीक्षक हरिष मडकईकर हे पोलीस फौजफाटय़ासह इस्पितळात दाखल झाले. डॉ. कुवेलकर यांना बोलावून घेत डॉ. भाटीकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. फर्मागुडीतील दिलासा इस्पितळात आयडीमध्ये मिळणाऱया सर्व सोयी रुग्णांना उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन केदार नाईक व डॉ. कुवेलकर यांनी दिल्यानंतर तणाव निवळला. सरकारने फोंडय़ातील रुग्णांसाठी केलेली ही पर्यायी सोय, गैरसोय ठरणार नाही याची काळजी घेण्याची मागणीही डॉ. भाटीकर यांनी केली आहे.









