डॉ. मंजुनाथ गौरोशी यांची माहिती : मास्क, सामाजिक अंतरासह इतर नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे
मनीषा सुभेदार / बेळगाव
कोरोना नव्हे तर तुमचे दुर्लक्ष करणे गंभीर आहे,
तरुणांनो स्थूलत्व कमी करा,
किमान हा महिना घरातसुद्धा मास्क वापरा, कोरोना बरा होऊ शकतो, ताण घेण्याचे टाळा,
रेमडेसिवीरबाबत निष्कारण अस्वस्थ (पॅनिक) होऊ नका.
या अत्यंत महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत डॉ. मंजुनाथ गौरोशी यांनी. डॉ. मंजुनाथ हे केएलई येथे कार्यरत असून ते एमडी (मेडीसीन) पदवीधर आहेत. पिडीऍट्रीक एन्डोक्रोनोलॉजिस्ट म्हणून ते प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर सर्कल येथे त्यांचे स्वतःचे क्लिनिक असून आजपर्यंत त्यांनी 3 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांना बरे केले आहे. या अनुषंगाने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी या टीप्स दिल्या.
प्रश्न : लोक इतके भयभीत का झाले व ही लाट तीव्र का झाली?
उत्तर :- रुग्णांसह सर्वांचेच दुर्लक्ष ही लाट तीव्र होण्याचे कारण आहे. लोकांनी मास्क घालण्याबाबत दुर्लक्ष केले. जे लोक बाहेर जातात ते मास्कही वापरत नाहीत. शिवाय ते घरी जातात. त्यामुळे त्यांच्या घरातील सदस्यांना संसर्ग होण्याची शक्मयता असते. यावर उत्तम उपाय म्हणजे मास्क बाहेर आणि घरातही वापरावा. किमान हा महिना तरी घरीदारी मास्क वापरणे आवश्यक आहे.
प्रश्न : लस आली आहे पण ती मिळत नाही. तथापि, ही लस कितपत उपयुक्त ठरेल?
उत्तर :- लस काहीअंशी व्यक्तीला सुरक्षित करते. लस कोरोना रोखू शकेल असे नाही. परंतु न्यूमोनिया होण्यापासून नक्कीच वाचवू शकेल. माईल्ड (सौम्य), मॉडरेट व सिरिअस असे तीन टप्पे आहेत. ताप, सर्दी, खोकला दोन-तीन दिवसांनी बरा झाला तर ते माईल्ड लक्षण होते, असे समजावे. परंतु जर चौथ्या दिवसानंतरही ताप उतरला नाही तर न्यूमोनिया होण्याची शक्मयता वाढते. त्यामुळे चौथ्या दिवशी किंवा त्यानंतर आलेल्या तापाकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
प्रश्न : याबाबतची लक्षणे कशी ओळखावीत?
उत्तर :- ताप न उतरणे, भूक न लागणे, चव न लागणे, प्रचंड अस्वस्थता असणे ही याची लक्षणे असू शकतात. हा आजार गंभीर नाही. परंतु दुर्लक्ष करणे गंभीर आहे. बरेचसे लोक पित्त झाले आहे असे समजून स्वतःच औषधे घेतात किंवा दुर्लक्ष करतात. तसे मुळीच करू नका.
प्रश्न : रेमडेसिवीरची गरज आणि आवश्यकता किती?
उत्तर :- पहिल्या आठवडय़ामध्ये रेमडेसिवीर उपयुक्त ठरू शकते. जर ताप येवून दुसरा आठवडा सुरू असेल तर त्याची फारशी जरुरी भासत नाही. दुसऱया आठवडय़ात स्टेरॉईड्स, ब्लड थिनर (रक्त पातळ करण्याचे औषध) व ऍन्टीबायोटिक्स पुरेसे ठरतात. ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसचे मेडीसीन विभाग प्रमुखसुद्धा रेमडेसिवीरला इतके महत्त्व देवू नका, असे सांगत आहेत. परंतु लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. एखाद्या चित्रपटाचे तिकीट ब्लॅकने विकले गेले तर त्याचे महत्त्व वाढते, तशीच बाब रेमडेसिवीरबाबत झाली आहे. मात्र लोकांनी हे वास्तव समजून घेऊन या इंजेक्शनसाठी ताण वाढवून घेण्याची गरज नाही.
प्रश्न : ऑक्सिजनची गरज केंव्हा भासते?
उत्तर :- ऑक्सिजनची पातळी 93 च्या खाली गेली तर ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासते. कधीकधी 90 टक्क्मयांपर्यंतही प्रतीक्षा करणे शक्मय आहे. मात्र रुग्ण नॉर्मल असताना ही पातळी तपासायला हवी. रुग्ण दमला असेल किंवा शौचाला जावून आल्या आल्या ही पातळी तपासून उपयोग नाही. तो पूर्ण ताण विरहीत असताना ही पातळी तपासणे आवश्यक आहे.
प्रश्न : सिटीस्कॅन कधी करावे लागते?
उत्तर :– एक ते पाचव्या दिवसापर्यंत सिटीस्कॅनची गरज भासत नाही. स्वॅब टेस्ट निगेटिव्ह आहे. परंतु व्यक्तीला काही लक्षणे जाणवत आहेत, अशावेळी अचूक निदान करण्यासाठी सिटीस्कॅन आवश्यक ठरते.
प्रश्न : लॉकडाऊनमुळे कोरोना नियंत्रणात येईल का?
उत्तर :- नाही. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा विषाणू जाणार नाही तर आरोग्यसेवेवरील ताण कमी होईल. आता कोरोनाची लाट अतिप्रभावी आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय योग्य आहे. यापूर्वी लॉकडाऊन आवश्यक होता, असे मला वाटत नाही. मात्र लॉकडाऊन उठल्यानंतरसुद्धा मास्क, सामाजिक अंतर आणि इतर नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. लोक हात धुतात, अंतर पाळतात. परंतु मास्कबाबत कमालीचे उदासीन आहेत. ही उदासीनता त्वरित झटका आणि नेहमी मास्कचा वापर करा.
प्रश्न : ताण आणि कोरोनाचा किती संबंध आहे?
उत्तर :– अत्यंत जवळचा संबंध आहे. ताण वाढला की अस्वस्थता वाढते. नकारात्मकता वाढते. मला काही होणार नाही किंवा मी बरा होणार, हा विचार सतत करायला हवा. कोरोनाचा ताण घेतला नाही तर लवकर बरे होण्यास मदत होते.
प्रश्न : तुम्ही इतके रुग्ण बरे केले आहेत तर बेळगावकरांना काय सांगाल?
उत्तर :- एक डॉक्टर म्हणून मी इतकेच सांगेन की, मास्क वापरा, कोरोना टाळण्यासाठी कोविड-19 चे नियम महत्त्वाचे आहेत. याच कालावधीत वाफ घेणे उपयुक्त ठरेल. भात, मैद्याचे पदार्थ व साखर कमी करून प्रोटीन्स व कार्बोहायडेट्स (प्रथिने व कर्बोदके) यांचे प्रमाण वाढवा. कोरोना निश्चित बरा होऊ शकतो. यावर विश्वास ठेवा.
तरुणांनो वेळीच सावध व्हा!
कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये अनेक तरुण दगावत आहेत. याचे नेमके कारण विचारता डॉक्टरांनी दिलेले उत्तर फार गंभीरपणे घेण्याची गरज आहे. ते म्हणाले, स्थूलत्व (लठ्ठपणा) हे याचे मुख्य कारण आहे. मुलांचा क्यायाम कमी झाला आहे. बैठी जीवनशैली आहे. भारतीय आहारपद्धती सर्वोत्तम असताना त्यांनी पाश्चात्य आहारपद्धतीचा स्वीकार करून नाष्टा, जेवण यांच्यावेळा बदलल्या आहेत. मुख्य म्हणजे जंकफूड खाण्यावर भर दिला आहे. त्यांच्या शरीरात अनावश्यक मेद वाढतो आहे. अनेक तरुणांना मधुमेह होतो आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागतात, त्यावेळी केलेल्या तपासणीमध्ये साखरेची पातळी अमर्याद वाढल्याचे आढळून येते व गुंतागुंत वाढून जीवाला धोका निर्माण होत आहे.