दोडामार्गला माकडताप आढावा बैठकीत सीईओंच्या सूचना
वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्ग तालुक्यात माकडताप हा चिंतेचा विषय बनला असून बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी दोडामार्ग पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील आरोग्य अधिकाऱयांची बैठक घेतली. माकडतापाबाबत सविस्तर अहवाल घेत प्रतिबंध करण्यासाठी त्याचे निदान लवकरात लवकर व्हावे, यासाठी रुग्णांच्या रक्ताचे नमुने जलदगतीने तपासणीसाठी कसे पोहोचतील, याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना केल्या.
येथील पंचायत समितीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झालेल्या बैठकीला डॉ. वसेकर यांच्यासह गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. तुषार चिपूळणकर, डॉ. गजानन सारंग, डॉ. एम. डी. अंधारी तसेच ग्रामसेवक, वनकर्मचारी उपस्थित होते.
यापूर्वी मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, त्यानंतर जि. प. अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, आरोग्य सभापती सावी लोके आदींनी भेट देत माकडतापासंदर्भात आढावा घेतला होता. तर बुधवारी डॉ. वसेकर यांनी आढावा घेतला.
लॉकडाऊन परिस्थितीत सहकार्य महत्वाचे!
डॉ. वसेकर म्हणाले, माकडतापाचा सामना करण्यासाठी सद्यस्थितीत उपलब्ध आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्याकडूनच कामाचे नियोजन महत्वाचे आहे. रिक्त पदे असल्याची आपल्याला कल्पना आहे. मात्र, लॉकडाऊन संपेपर्यंत याबाबतची कार्यवाही करता येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊननंतर होणाऱया बदली प्रक्रियेत आवश्यक कर्मचारी वर्ग देण्यात येणार असल्याचे वसेकर यांनी सांगितले.
रुग्णांचे निदान लवकरात लवकर व्हावे!
साध्या तापाचा रुग्ण जरी आरोग्य केंद्रात आला तरी त्याच्या रक्ताचे नमुने जिल्हय़ाला पाठवा. रक्तनमुने जलद पाठविण्याचे नियोजन करावे. तसे झाल्यास योग्य उपचार करता येणार आहेत. शिवाय मणिपाल येथील बंद असलेले माकडताप निदान केंद्र सुरू करण्यासंदर्भातही वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.









