प्रतिनिधी / बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमधील गैरसोयी, रुग्णसेवेतील दिरंगाई, बेड नाही, ऑक्सिजन नाही असे सांगत मरणासन्न रुग्णांना परत पाठविण्याचे प्रकार आदींमुळे ठळक चर्चेत आलेल्या बिम्समधील कंत्राटी परिचारिकांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्ण मरत आहेत तर पुरेशा अन्नाशिवाय भुकेने आम्ही मरायचे का, असा संतप्त सवाल त्यांनी बिम्स प्रशासनाला विचारला आहे.
बुधवारी 3 मिनिटे 10 सेकंदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आम्हाला पुरेसे वेतन मिळावे यासाठी बिम्समधील 35 हून अधिक कंत्राटी परिचारिकांचा गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. गेल्यावषी कोरोनाच्या काळात याच कंत्राटी परिचारिकांनी उत्तम कामगिरी बजावली होती. यंदाही रुग्णसेवेसाठी त्या आघाडीवर आहेत. तरीही त्यांच्या पगाराचा विचार होत नाही म्हणून त्यांनी बिम्स प्रशासनाला संतप्त सवाल विचारला आहे.
गेल्या 13 वर्षांपासून दरमहा 10 ते 12 हजारांवर हे 35 कर्मचारी बिम्समध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. कर्नाटकातील इतर स्वायत्त वैद्यकीय महाविद्यालयांनी कंत्राटी परिचारिकांना न्याय दिला आहे. बिम्सने मात्र त्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही. प्रत्येकांना 5 हजार रुपये कोविड अलॉऊन्स देण्याचा सरकारचा आदेश आहे. त्याचेही अद्याप पालन होताना दिसत नाही, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे.
आम्ही बिम्सच्या वैद्यकीय संचालकांना भेटलो तर तुमचे काम सरकार दरबारीच होणार असे सांगत ते सरकारकडे बोट दाखवितात. तर सरकारमधील जबाबदारांशी चर्चा केली तर तुमचा वैद्यकीय संचालकच तुम्हाला न्याय देणार, असे सांगतात. दहा ते बारा हजारांमध्ये घरभाडे, किराणा माल, मुलांचे शिक्षण कसे परवडणार? आम्ही कसेबसे संसाराचा गाडा चालवत आहोत. गेल्यावषी कोरोनाच्या काळात आम्ही आमच्या मुलांना गावी पाठविलो. जीवावर उदार होऊन आम्ही काम केले आहे, तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गेल्या 13 वर्षांपासून रुग्णसेवा करूनही परिचारिकांइतका पगार आम्हाला मिळत नाही. ही समस्या इतर सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी दूर केली आहे. केवळ बिम्सने त्याकडे कानाडोळा केला आहे.
आमच्या समस्यांकडे पालकमंत्री लक्ष घालतील का?
बिम्समध्ये सर्व काही ठिक नाही हे लक्षात येते. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अनेकवेळा अधिकाऱयांच्या बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तरीही बिम्ससंदर्भात त्यांना अंधारात ठेवण्यात आले आहे. स्वतः उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बोलाविलेल्या बैठकीकडे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे त्यांना अटक करून घेऊन या, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱयांना केली होती. एकंदर परिस्थिती लक्षात घेता बिम्समधील भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य रुग्णांना उपचार मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ हे याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बिम्स प्रशासनाविरुद्ध जनमाणसांतील भावना तीव्र होत आहेत. कारण वेळेत उपचार मिळत नाही, रुग्णांची जबाबदारी घेण्यास कोणीच तयार नाहीत, या भावनांचा उदेक होण्याआधी राज्य सरकारने त्याची दखल घेण्याची गरज आहे.









