तत्कालीन अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळेंवर फसवणुकीचा आरोप
प्रतिनिधी / मिरज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या तत्कालीन अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी शासनाच्या पैशातून खरेदी केलेली रुग्णवाहिका ही आपल्या कुटुंब परिवाराच्यावतीने रुग्णालयास दान म्हणून दिली असल्याचा भास निर्माण करुन शासनाची आणि जनतेची फसवणूक केली आहे. शासकीय रुग्णालयाच्या एचडीएफसी बँक खात्यातू 13 लाख, दोन हजार रुपयांची उधळपट्टी झाल्याची बाब संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेने उघडकीस आणली आहे. या प्रकरणाची आरोग्य मंत्र्यांनी 15 डिसेंबरपर्यंत सखोल चौकशी करुन डॉ. सापळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिला.
सन 2018 च्या कालावधीत शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता म्हणून डॉ. पल्लवी सापळे कार्यरत होत्या. शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी विभागाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. सुप्रिया प्रभाकर सापळे (परिवार) यांच्याकडून सदर रक्तपेढीला देणगी म्हणून रुग्णवाहिका (एमएच-10-सीआर-5038) देण्यात आली. सदरचा कार्यक्रमही थाटामाटात पार पडला होता. वास्तविक रुग्णालयाच्या एचडीएफसी बँक खात्यातूनच 13 लाख, दोन हजार रुपये खर्चून सदरची रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, डॉ. सापळे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन रुग्णालयाच्या पैशातून खरेदी केलेली रुग्णवाहिका ही आपल्या कुटुंबाने दान दिली असल्याचा भास निर्माण केला, असा आरोप डॉ. महेशकुमार कांबळे यांनी यावेळी केला. यावेळी डॉ. कांबळे यांनी पत्रकार बैठकीत याबाबतचे सर्व पुरावेही सादर केले.