एपीएमसी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका 55 वषीय इसमाच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने सिव्हिल हॉस्पिटलवर दगडफेक करून रुग्णवाहिका पेटविल्याची घटना पाच महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी गुरुवारी शाहूनगर येथील तरुणाला अटक केली आहे.
अर्शद राजगोळी (वय 19, रा. शाहूनगर) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 25 जणांना अटक करण्यात आली आहे.
22 जुलै रोजी रात्री संतप्त जमावाने सिव्हिल हॉस्पिटलवर दगडफेक करून रुग्णवाहिका पेटविली होती. कोरोना वॉर्डबाहेर रस्त्यावर उभी करण्यात आलेल्या वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. या घटनेने कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी घाबरून गेले होते.
या घटनेनंतर एक-दोन दिवसांत एपीएमसी पोलिसांनी 14 जणांना अटक केली होती. त्यापैकी 13 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर एकूण 24 जणांना अटक करण्यात आली होती. गुरुवारी अटक करण्यात आलेला अर्शद हा 25 वा असल्याचे पोलिसांनी सांगितले. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.