ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावत आहे. दुसरी लाट येण्याची शक्यताही मावळताना दिसत आहे. तसेच आठवडाभरात देशात कोरोनाची लस येण्याची शक्यताही पंतप्रधान मोदींनी वर्तवली आहे. मात्र, लस आली तरी कोरोना संपला असे होणार नाही, बेसावधपणामुळे अचानक कोरोनाचे आकडे वाढूही शकतात. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळून काळजी घेण्याची गरज आहे.
देशातील संसर्ग वाढ पूर्णपणे थांबविण्यासाठी सोशल डिस्टन्स आणि कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. देशात दररोज 90 हजारांच्या पटीत आढळणारे रुग्ण आता 30 ते 35 हजारांवर आल्याने हा आकडा काहीसा दिलासादायक आहे. थंडीच्या दिवसात आणि सध्याच्या कोरोनाच्या संसर्गात वाढत्या थंडीत सर्दी, खोकला, तापाची लक्षणे लोकांमध्ये आढळत आहेत. त्यावर उपचार घेण्यासाठी दवाखान्यांमध्ये गर्दी होवू लागली आहे. कोरोना संसर्गाविरुध्द लढा सुरू ठेवण्यासाठी काळजी घेणे आवश्यक झाले आहे.
दरम्यान, देशात मागील 24 तासात 36 हजार 652 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 512 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 96 लाख 08 हजार 211 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 39 हजार 700 एवढी आहे.
शनिवारी दिवसभरात 42,533 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 4 लाख 09 हजार 689 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 90 लाख 58 हजार 822 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.









