प्रतिनिधी / इचलकरंजी
रुई ता. हातकणंगले येथील कलाकार असलेल्या बापलेकाच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. जुन्या चित्रपट आणि नाटकात काम करणारे बबन उर्फ बाबासो अप्पू खुरपे( वय 55) यांचे काल रात्री निधन झाले. तर त्यांच्या पाठोपाठ उदयोन्मुख संगीतकार म्हणून नावलौकिक करत असलेल्या अमित खुरपे ( वय 32) यांचेही आज सकाळी कोरुना संसर्गाने पुणे येथे निधन झाले. या निधनाने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.
बबन खुरपे हे लहानपणापासूनच नाटकांमध्ये काम करत होते.रुई येथील न्यू भारत नाट्य क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकात काम केले. त्याचबरोबर गावांमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंग होत होते. रविंद्र महाजनी, उषा नाईक यांच्यासह अनेक कलाकारांच्या समवेत बबन खुरपे यांनी चित्रपटात छोटी-मोठी कामे केली होती. जिल्ह्यात नावाजलेल्या चीलखा इलेव्हन संघातील ते उत्कृष्ट गोलंदाज होते. आपल्या पाठोपाठच त्यांनी थोरला मुलगा अमित यास ही संगीत क्षेत्राचे ज्ञान दिले होते. अनेक अल्बम त्याचबरोबर काही लघु चित्रपटांनाही अमित याने संगीत दिले होते.हे सर्व कुटुंबीय अलीकडच्या काळात पुणे येथे वास्तव्यास होते.
पुण्यात बबन यांच्यासह अमित तसेच त्यांच्या कुटुंबियातील अन्य दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दोघांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल रात्री उशिरा श्री बबन यांचे निधन झाले तर आज दुपारी अमित यांचे निधन झाले.









