लॉकडाऊन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी मनोज परब व इतर चार जणांना अटक, सुटका : राजकीय रंग असल्याची चर्चा .
पेडणे (प्रतिनिधी ) सध्या गोवा राज्यात राजकीय व्यक्तींची झोप उडविणा-या रिव्होल्युशनरी ऑफ गोवन्स या संघटनेचा दरारा राजकीय व्यक्तीना असून या संघटनेचे प्रमुख असलेले मनोज परब यांनी संपूर्ण गोव्यात आज हजारो कार्यकर्ते तयार केले असून या युवकांची मोठी फौज सर्वत्र गोव्याच्या विविध भागात जाऊन स्थानिक राजकर्ते यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवत असतानाच या रिव्होल्युशनरीला आता पेडणे तालुक्मयात आव्हान देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्याशी हुज्जत
धारगळ येथे एका बैठकीत रिव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत प्रश्न विचारून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत हुज्जत घातली होती. या प्रकरणी या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करत पेडणे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या अटकेची माहिती मिळताच रिव्होल्युशनरी ऑफ गोवन्सचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमा होऊन आजगावकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. तेव्हापासून रिव्होल्युशनरी ऑफ गोवन्स व आजगावकर यांच्यात ठिणगी पडली होती.
रिव्होल्युशनरी ऑफ गोवन्सच्या मनोज परब यांना पेडणेतून आव्हान
रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी संपूर्ण गोव्यात राजकर्त्यांच्या हृदयात धडकी भरली होती. हजारो कार्यकर्ते त्यांच्या सभांना जमा होत होते. मात्र दि . 14 रोजी हसापूर येथे रिव्होल्युशनरी गोवन्सचे कार्यकर्ते जमा होऊन वाढदिवस पार्टी साजरी केली .यावेळी त्यांनी आणलेल्या महिंद्रा जीप गाडीला कोणीतरी आग लावून या वादाला आणखीनच भडका उडवून देत बाबू आजगावकर यांच्या मतदारसंघातच मनोज परबला आव्हान दिले आहे. यामुळे येणाऱया दिवसात रिव्होल्युशनरी ऑफ गोवन्सचे कार्यकर्ते आणि त्याचे प्रमुख मनोज परब यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लॉकडाऊन कायद्याचा भंग करून मागच्या आठवडय़ात टेंबवाडा मोरजी किनारी 70 रशियन पर्यटकांनी रात्रभर पार्टी आयोजित केली. त्यांच्यावर गुन्हा किंवा कुणालाही अटक नाही , मात्र 14 रोजी सायंकाळी हसापुर येथे स्थानिकांचा वाढदिवस काही रिव्होल्युशनरी ऑफ गोवन्स कार्यकर्त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याचा लॉकडाऊन असताना जमाव करुन वाढदिवस साजरा केला . यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले याकारणासाठी पेडणे पोलिसांनी रिव्होल्युशनरी ऑफ गोवन्स या संघटनेचे प्रमुख मनोज परब पीर्ण व त्यांचे इतर सहकारी रिकार्ड मास्कारेन्स (हसापूर), विशेष नाईक (आडपई फोंडा) , आलेक्स डिसोझा ड चांदेल ़ व मिल्टन डिसोझा याना भारतीय दंड संहिता कलम 269 ,व 188 कलमाखाली गुन्हा नोंद करुन अटक केली आणि जामिनावर पाचही जणांची सुटका केली . मात्र ज्यांचे वाहन जाळले त्या संशयिताना अजूनपर्यंत पोलिसांनी अटक केली नाही .
सविस्तर माहितीनुसार 14 रोजी पिंपळवाडा हसापुर येथे एका युवकाचा वाढदिवस होता .तो वाढदिवस साजरा करण्यासाठी काही रिव्होल्युशनरी गोवन्सचे काही कार्यकर्ते मनोज परब व इतर कार्यकर्ते गेले होते , त्यावेळी रस्त्याच्या बाजूला जी. ए 07 यु 8899 हि जीप धार गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क करून कार्यकर्ते वाढदिवस साजरा करायला गेले होते . लॉकडाऊन काळात जास्त जमाव करणे गुन्हा ठरू शकतो , मात्र घरगुती पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला . काही राजकीय कार्यकर्त्याना रिव्होल्युशनरी ऑफ गोवन्सचे कार्यकर्ते जमा झाल्याची माहिती मिळतच होती. रात्री उशिरा या वाहनाला कोणीतरी आग लावली. पेडणे अग्निशामक दलाला माहिती मिळताच अग्निबंब घटनास्थळी गेला त्यावेळी वाहन पूर्ण जळाले होते . घटनेची गंभीर दखल घेत लॉकडाऊन काळात भंग केल्याच्या कारणामुळे पेडणे पोलिसांनी मनोज परब व त्याचे चार सहकाऱयाना 15 रोजी उशिरा अटक करून सुटका केली .
वाहन जाळणारे संशयित अजूनही मोकाट
वीरेश बोरकर यांच्या मालकीचे वाहन आलेक्स डिसोझा या मित्राला त्यांनी दिले होते. तो वाहन घेवून हसापूर येथे गेला होता . त्या ठिकाणी आपले वाहन कुणीतरी 14 रोजी जाळून टाकल्याची तक्रार पेडणे पोलिसाना बुधवारी 15 रोजी दिली होती. त्यासंबंधी अजूनही संशयिताना पोलिसांनी अटक केली नाही .
वाहन जाळण्यामागे राजकीय शक्तीचा हात असल्याची चर्चा
रिव्होल्युशनरी ऑफ गोवन्सच्या कार्यकर्त्यांचे ना वाहन जाळण्यामागे राजकीय शक्तीचा हात असल्याचे बोलले जात असून तशी चर्चा पेडणेत आहे. संशयिताना पकडून पेडणे पोलिसांनी गजाआड करावे, अशी मागणी होत आहे .
लॉकडाऊन काळात नियमाचा भंग करणे योग्य नव्हेः उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर
पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी यासंबंधी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की , देशात आणि राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन असून 144 कलम लावण्यात आले आहे. असे असताना पेडणे बाहेरील काही व्यक्ती हसापूर पेडणे येथे येतात व स्थानिकांना घेऊन वाढदिवस साजरा करतात हे योग्य नसून हे कायद्याचे आणि नियमाचे उल्लंघन आहे. रिव्होल्युशनरी गोवन्सचे कार्यकर्ते यांनी आपणाला धारगळ येथे एका बैठकीवेळी लॉकडाऊन नसताना मला लॉकडाऊन मोडले म्हणून प्रश्न विचारले व हुज्जत घातली होती. मग आता दुसऱयांना विचारणारे हे आपण काय करतात हे ते पाहत नाही. वाढदिवस साजरे करुन दारु पिणे व इतर वाईट गोष्टी करणे हे योग्य नसल्याचे उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी सांगितले .
दरम्यान, मागच्या आठवडय़ात लॉकडाऊनचे उल्लंघन करत मोरजी येथे रशियन पर्यटकांनी एका जंगी पार्टीचे रात्रभर आयोजन केले होते .त्यातील सहभागी पर्यटकांना पोलिसांनी अजूनपर्यंत अटक केली नाही .
कारवाई कराः तुळशीदास गावस
लॉकडाऊन संपूर्ण देशभर आणि राज्यात असून या काळात जमाव करणे याला कायद्याने बंदी आहे, मात्र हसापूर पेडणे येथे रिव्होल्युशनरी गोवन्स या संघटनेचे काही कार्यकर्ते पेडणे बाहेरून येतात व स्थानिकांना सोबत घेतात व वाढदिवस करतात हे बरोबर नसून जे कोणी यात सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पेडणे मतदारसंघाचे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी केली.
मनोज परब यांचा मोबाईल स्वीच ऑफ
दरम्यान, मनोज परब यांनी दुपारी एक व्हिडिओ युटय़ूबवर घातला असून यात आपल्याला व पोलिसांनी घरात पेडणे पोलिसांनी रात्री उशिरा नेले व आपणही त्यात सहभागी आसल्याबद्दल आपल्यावर व इतरावर गुन्हा नोंद केला असल्याची सांगून आमची आमची सुटका झाली, असे सांगितले आहे. मनोज परब यांच्याकडे त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे कळले.